फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी झापल्याने तरुणाची आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी झापल्याने तरुणाची आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

खरेदी केलेल्या मोबाईलचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्‍यांनी घरी येऊन झापल्याच्या संतापात योगेश्वर नगरातील अशुतोष अनिल पाटील (वय 29, मुळ रा.असोदा, ता.जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात आज बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशुतोष याने फायनान्स कंपनीकडून महागडा मोबाईल खरेदी केला होता. त्याचे हप्ते थकले होते. त्याची वसुली करण्यासाठी काही कर्मचारी मंगळवारी सायंकाळी घरी आले होते.

दुचाकी घेऊन जाण्याचा दम त्यांनी भरला होता. वसुली करणारे घरी येऊन बोलून गेल्याने आपला अपमान झाल्याने संतापात त्याने रात्री राहत्या घरात गळफास घेतला. यावेळी वडील हॉटेलवर तर आई बाहेर गेली होती. रात्री 10 वाजता आई घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला.

नातेवाईकांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सहायक फौजदार मनोज इंद्रेकर यांनी पंचनामा केला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अशुतोष पुण्यात एका कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊनमुळे दीड वर्षापासून तो घरी आलेला होता. त्याचे वडील अनिल पाटील यांनी असोदा येथे हॉटेल डॉली या नावाने हॉटेल सुरु केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com