सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण

सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी राऊतांचे प्रतिपादन
सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण

जळगाव - Jalgaon

कोविड काळात योगाचे महत्व आपण सर्वांनीच जाणले आहेत. यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ ही असल्याने सामाजिक स्वास्थासाठी योगा हा महत्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, शालेय शिक्षण विभाग, जळगाव, हौशी योगा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ऑनलाईन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. राऊत बोलत होते.

या कार्यक्रमात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, डॉ अनिता पाटील, क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, योगप्रेमी ऑनलाईन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, योगा हा एक दिवसापुरता मर्यादित न रहाता तो दररोज करायला पहिजे, प्रत्येक नागरीकाने आपल्याला रोज जसा वेळ मिळेल तसा योगा केला पाहिजे. कोविडमुळे शाळा बंद आहे. शाळा नियमीत सुरु झाल्यावर शाळांमध्ये नियमितपणे योगाचे अभ्यास वर्ग कसे घेता येईल याबाबत विचार करण्यात येईल.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थाला योगदूत बनवुन एका विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबामध्ये योगाचा प्रचार केला तरी संपूर्ण समाजामध्ये जागृती होवू शकते. समाजाच्या स्वास्थासाठी मुलांनी योगदूत बनून योगाचा प्रचार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त सतिश कुलकर्णी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 21 जुन हा सौर वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. अशा या 21 जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता देण्यात आली. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी व स्वास्थासाठी योगा करणे महत्वाचे आहे, धर्म, अर्थ, काम यासाठी स्वास्थ अत्यंत आवश्यक असल्याने योगा करणे गरजेचे आहे. योगामुळे आपण शरीराचा मानसिक ताण घालवू शकतो. त्यामुळे आगामी काळात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वानी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा हौशी योगा असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता पाटील यांनी केंद्रीय विद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू नंदिनी दुसाने सोबत आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार योगाचे प्रात्याक्षिक, योगसाधना, प्राणायम, शरीर शिथलीकरणाची आसने, उभी व बसलेली आसने सहभागी विद्यार्थी, नागरीक यांना ऑनलाईन दाखवून करुन घेतली तसेच आसनांचे महत्वही सांगितले.

जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी मानले. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत व शालेयस्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऑनलाईन कॉमन योगा प्रोटोकॉल कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच बहुसंख्य नागरीक, विद्यार्थी, क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तर अनेकांनी घरी कुटुंबांसोबत योगसाधना केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद ‍दिक्षित यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com