एसटीच्या उत्पन्नावर फिरले पाणी
जळगाव

एसटीच्या उत्पन्नावर फिरले पाणी

यात्रा, सहली, प्रासंगिक करारांसह नियमित फेर्‍या बंदच

Rajendra Patil

जळगाव । प्रतिनिधी । Jalgaon

हिंदू धर्मियांसाठी व्रतवैकल्यांचा तसेच धार्मिक कार्यांसाठी शुभ असलेला श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी भाविकांसाठी एसटी महामंडळातर्फे विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले जाते. त्याद्वारे श्रावण महिन्यात भाविकांच्या प्रवासी वाहतुकीतून एसटी महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. परंतु यंदा करोनामुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाला हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.

या अगोदर चैत्र महिन्यात होणार्‍या सप्तशृंगी गडावरील यात्रा, आषाढ महिन्यात एकादशीच्या दिवशी समग्र महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असणार्‍या विठुरायाच्या पंढरपूर (Pandharpur) येथे विशेष बसेस सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाकडून केले जाते. इतकेच नव्हे तर विविध शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी (Educational trip) देखील प्रासंगिक करारावर बसेस सोडण्यात येतात. परंतु या वर्षी या सर्व हक्काच्या उत्पन्नपासून राज्य परिवहन महामंडळाला कोरोना साथरोग प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे वंचित राहावे लागले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात तसेच शेजारील नाशिक वा अन्य जिल्ह्यात कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा सण-उत्सव कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रावण महिन्यात येणार्‍या सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जिल्ह्यासह दूरवरून भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शन तसेच फेरीसाठी येत असल्याने एसटी महामंडळाकडून दरवर्षी विशेष बसेसचे नियोजन करण्यात येते. विशेषत: पहिल्या आणि तिसर्‍या श्रावणी सोमवारचे एसटीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. या काळात बर्‍याच ठिकाणी खासगी वाहनांना प्रतिबंध असतो. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात या दिवसात विशेष बससेवेमुळे भर पडते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तश्रृंग गड, त्यानंतर आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी सुमारे 150 ते 200 च्या वर बसेस सोडण्यात येतात. तसेच श्रावण महिन्यात जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर यात्रेच्या निमित्ताने बसेस सोडण्यात येतात. परंतु यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार नसल्याने त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर देखील होत आहे. आतापर्यंत करोडो रुपयांचा महसूली तोटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.
राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक
Deshdoot
www.deshdoot.com