जिल्ह्यात 20 हजार नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

63 लाखांचा दंड वसूल; पोलिस प्रशासनासह महानगरपालिकेची कारवाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असून नागरीकांसाठी नियमावलीही जाहिर केली आहे.

मात्र काही नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाने जिल्ह्यातील अशा 20 हजार 268 व्य्क्तींवर दंडात्मक कारवाई करुन त्यांचेकडून 63 लाख 6 हजार 400 रुपयांचा दंड वसुल केला आहे.

तसेच 574 व्यक्ती व संस्थावर गुन्हे दाखल करण्यात आले असून 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणार्‍या 19 हजार 77 व्यक्तींकडून 53 लाख 83 हजार 700 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 15 व्यक्तींकडून 69 हजार 800 रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 561 व्यक्तींकडून 2 लाख 17 हजार 400 रुपये दंड वसूल केला असून 531 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणार्‍या 241 प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना 4 लाख 80 हजार 300 रुपये दंड करुन 43 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत.

तसेच सार्वजनिक वाहतुक करणार्‍या 374 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 1 लाख 55 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाने मास्क न वापरणार्‍या 12 हजार 603 व्यक्तींकडून 26 लाख 81 हजार 200 रुपयांचा, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 531 व्यक्तींकडून 1 लाख 81 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला असून 531 व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले आहेत.

तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणारे 38 प्रतिष्ठानांकडून 69 हजार दंड करुन 38 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहे.

जळगावात कारवाईचा बडगा

जळगाव महानगरपालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणार्‍या 1 हजार 25 व्यक्तींकडून 4 लाख 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 8 व्यक्तींकडून 35 हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 5 व्यक्तींकडून 2 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या अनेक दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे . मनपासह जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्येही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com