संचारबंदीचे उल्लंघन : महिला पोलीस कर्मचार्‍यासह 81 जणांना दंड

मनपा, पोलीस प्रशासनाची कारवाई; 11 दुकाने सील
संचारबंदीचे उल्लंघन : महिला पोलीस कर्मचार्‍यासह 81 जणांना दंड

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या दुसर्‍या लाटेची साखळी तुटण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. सकाळी 11 वाजेनंतर संचारबंदी असल्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने टॉवर चौकात कारवाईची मोहीम राबविली.

दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍यासह 81 जणांवर प्रत्येकी 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील 11 दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरासह जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हा प्रशाससनासह पोलिस प्रशासनाने कारवाईची आदेश दिले आहे. त्यानुसार मनपा व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम राबविली. उपायुक्त संतोष वाहुळे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह मनपा अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस पथकाने टॉवर चौकात ठाण मांडले होते. यावेळी 81 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महिला पोलीस व उपायुक्तांमध्ये वाद

टॉवर चौकात कारवाई सुरु असतांना महिला पोलीस कर्मचार्‍याकडून दंड वसुल करण्यात आला. यावेळी महिला पोलीस कर्मचारी व उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यात वाद झाला.

11 दुकानांना ठोकले सील

अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. मात्र निर्धारीत वेळेपेक्षाही दुकाने सुरुच असल्याने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील 11 दुकानांवर सीलची कारवाई केली आहे.

यांच्यावर सीलची कारवाई

चित्रा चौकातील फिदा हुसैन अमरेलीवाला, माता टे्रडिंग कंपनी, एमजी रोडवरील उत्तम क्लॉथ स्टोअर्स, नेरीनाका चौकातील स्टॅन्डर्ड इलेक्ट्रीकल्स, रुद्र इलेक्ट्रीकल्स, शाहू महाराज कॉम्लेक्समधील परफेक्ट रेक्झीन सेंटर, सेंट्रल फुले मार्केटमधील मंगला ड्रेसेस, सराफ बाजारातील लालचंद छाजेड ज्वेलर्स, बालाजी पेठेतील अंबिका मेटल्स, ओमशांती नगरातील सर्वेश गारमेंटन्स, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील अर्जंट फोटो लॅब या दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com