वरणगाव पाणी पुरवठा योजना श्रेयवादाच्या भोवर्‍यात

योजनेला येतेय राजकिय रंगत
वरणगाव पाणी पुरवठा योजना श्रेयवादाच्या भोवर्‍यात

विजय वाघ

वरणगाव, ता. भुसावळ Bhusawal

शहराची वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषदेच्या माध्यमातुन नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी २५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर करून आणली आहे. मात्र, या योजनेच्या निविदेवरुन चांगलेच राजकारण तापले असून हि योजना आता श्रेयवादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.


शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या कालावधीत १३ कोटी ५० लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यावेळी सुनिल काळे यांनी त्यांच्या आई रुक्मीणी काळे ग्रामपंचायत सदस्य असतांना योजनेसाठी प्रयत्न केले होते. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे योजनेवरून शहरवासीयांना सात ते आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरवासीयांना दैनंदिन मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुनिल काळे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळताच त्यांनी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातुन २५ कोटी रुपयांच्या नविन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवुन आणली. मात्र, योजनेच्या कामासाठी आलेल्या निविदा तिन वेळा काही नगरसेवकांच्या हरकतीमुळे रद्द करण्यात आल्या. यानंतर हे प्रकरण श्रेयवादामुळे चांगलेच रंगले आहे .

योजनेकडे शहरवासीयांचे लागले लक्ष - २५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनेची निविदा जिवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मंजुरी अभावी पडुन आहे. यामुळे निविदेला केव्हा मंजुरी मिळते. व प्रत्यक्षात कामाला केव्हा सुरुवात होते. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा होवु घातलेल्या नगर परिषद निवडणूकीमध्ये चांगलाच गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, भाजपाच्या माध्यमातुन प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com