कोविड काळातील कंत्राटी कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

250 कर्मचार्‍यांचा समावेश; करार संपल्याने प्रशासनाकडून कपात
कोविड काळातील कंत्राटी कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 250 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती. मात्र, या कर्मचार्‍यांचा करार संपल्यापूर्वी काहींना कमी करण्यात आले.

तर काहींना नोव्हेंबर अखेर 250 कंत्राटी कर्मचार्‍यांची कपात केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी कर्मचारी कमी केल्याने त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

कोरोना काळात जिह्याभरात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल या तीन पातळ्यावर उपचार पद्धती सुरु करण्यात आली होती.

95 कोविड केअर सेंटर, दोन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल आणि त्यानंतर कोविड हेल्थ सेंटर यामध्ये अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने कंत्राटी भरती करण्यात आली होती.

या भरती दरम्यान जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील तब्बल 50 टक्के पदे रिक्त होती. ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षकांची पदे सर्वच पदे रिक्त असल्याचे चित्र होते.

अशा परिस्थितीत कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. त्यानंतर विविध पातळ्यांवर कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

यात अखेर काही निकष शिथिल करुन आयुष, युनानी आदींनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, पुरेशी यंत्रणा उपलब्ध होत नव्हते. दर मंगळवारी ही भरती प्रकि्र्या राबविण्यात आली होती.

त्यानंतर काही प्रमाणात कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध झाले. त्यात काही डॉक्टर, नर्सेस, कक्षसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ अशी सुमारे 250 पदे भरण्यात आली होती.

31 नोव्हेंबर रोजी यातील अनेकांची सेवा खंडित केली तर काहींच्या सेवेचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. मात्र, या कंत्राटी कर्मचार्‍यांची मध्यंतरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आम्हाला सेवेत कायम करुन घ्यावे, अशी मागणी केली होती.

दरम्यान, कंत्राटी कर्मचार्‍यांनी कोरोना काळात पूर्ण वेळ सेवा दिली आणि शासकीय सर्व कामे पार पाडली. मात्र, कोविड संपल्यानंतर त्यांना तातडीने कमी करण्यात आले.

कंत्राटी कक्षसेवकांना कायम सेवेत घेण्याची मागणी

कंत्राटी पद्धतीने कोविड कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कक्षसेवकांना मुदत वाढवून कायम सेवेत देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या कर्मचार्‍यांना एनआरएचएममध्ये न घेता ठेका पद्धतीने घेण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com