जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील कांचननगरात राहणार्या महिलेची दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले 30 हजार रूपयांची रोकड शनिवारी मध्यरात्री लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा अवघ्या काही तासातच शनिपेठ पोलिसांनी उलगडा केला असून दुचाकीसह चौघांना सोयगाव जि. औरंगाबाद येथून अटक केली आहे. दरम्यान या घटनेत संबंधित विधवा महिलेकडे काम करणार्या तरुणानेच हा प्रकार घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी प्रविण शिरसाठ (वय-34) रा. हातेड ता. चोपडा ह.मु. वाणी मंगल कार्यालय कांचन नगर यांच्याकडे स्कुटी (क्रमांक एमएच 19 डीबी 2870) आहे. शुक्रवारी 20 फेब्रुवारी सायंकाळी त्यांनी दुचाकी वाणी मंगल कार्यालयासमोर पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी शनीवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी लांबविली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले 30 हजार रोकड होती. दुचाकीसह रोकड लंपास झाल्याने मोहिनी शिरसाठ यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिलेची कामे करणार्या तरुणानेच केला घात

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांबाबत शनिपेठ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. महिला विधावा असल्याने तिने सांगितल्यानुसार दिपक पाटील तरुण कामे करत होता. तिला दुचाकी चालविता येत नसल्याने दिपक हाच दुचाकीवरुन संबंधित महिलेला सोबत घेवून जावून कामे पूर्ण करायचा. त्यानुसार दिपकवर शनिपेठ पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले.

दिपक व संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. दिनेशसिंग पाटील, सपोनि अमोल कवळे, रविंद्र पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे, इंदल जाधव, रविंद्र बोदडे यांच्या पथकाने निंबायती तांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथून संशयित दिपक राजेंद्र पाटील रा. वाल्मिक नगर, रूपेश ईश्वर पाटील रा. मेक्सोमाता नगर, संदीप संजय पवार (वय-23) आणि निलेश सुरेश इंगळे (वय-24) दोन्ही रा. निंबायती ता. सोयगाव जि. औरंगाबाद चौघांना अटक केली आहे.

दुचाकी घेणारेही सहआरोपी

यातील संशयित आरोपी दिपक पाटील आणि रूपेश पाटील यांनी जळगावातून दुचाकी चोरून नेवून निंबायती तांडा येथे विक्री केली. चोरीची दुचाकी घेणार्या संदीप पवार आणि निलेश इंगळे यांनाही पोलिसांनी गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. चौघांकडून दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील तपास पोहेकॉ परिश जाधव करीत आहे.