मध्य प्रदेशातील दुचाकी चोराला अटक

स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
मध्य प्रदेशातील दुचाकी चोराला अटक

जळगाव - तालुक्यातील फुपनगरी येथून शेतकर्‍या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या विरसिंग शिवलाल बारेला (बोरगाव ता. पधाना जि. खंडवा मध्य प्रदेश) या संशयितास आज मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील कानळदा गावातुन अटक केली आहे त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील फुफनगरीतील श्यामकांत जाधव या शेतकऱ्याची दुचाकी चोरीची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुचाकी चोरणारा संशयित हा कानळदा येथे त्याच्या नातेवाइकाकडे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार बकाले यांनी हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक हे.कॉ. भारत पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार पथक आज मंगळवारी कानळदा गावात पोचल्यावर संशयित वीरसिंग बारेला हा चोरीच्या दुचाकीवर फिरताना मिळून आला. पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी ताब्यात घेतली. गेल्या दोन वर्षांपासून संशयित बारेला हा दुचाकीची नंबरप्लेट काढून चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com