अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मयत देवगाव येथील रहिवासी
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

चुलत मामाच्या साखरपुड्यासाठी बामणोद ता. यावल येथे जाण्यासाठी घरून निघाला. मात्र साखरपुड्याला न जाता विदगावपासून दुचाकीने घराकडे परतणार्‍या सोपान सुभाष शिरसाठ (वय 25) रा. देवगाव ता. जळगाव यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवार, 18 जुलै रोजी दुपारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरुन मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनास्थळी मिळून आलेल्या दुचाकीवरुन तरुणाची ओळख पटली.

जळगाव तालुक्यातील देवगाव येथे सोपान हा आई वडीलांसह राहतो. रविवारी, 18 जुलै रोजी त्याच्या चुलत मामाचा बामणोद येथे साखरपूडा होता. या साखरपुड्यासाठी सोपान त्याची दुचाकीने एम.एच 19 डी.एम.6653 ने बामणोद जाण्यासाठी निघाला. मात्र तो बामणोदला पोहचलाच नाही. याठिकाणी त्याचे मामा वासुदेव नामदेव सोनवणे, कैलास नामदेव सोनवणे दोन्ही रा. जळगाव यांनी सोपानची वाट बघितली. मात्र तो विदगाव येथून पुन्हा देवगावकडे जाण्यासाठी निघाल्याचे त्यांना समजले.

विदगाव येथून पुन्हा सोपान देवगावकडे जाण्यासाठी निघाला. यादरम्यान बांभोरीजवळ त्याचे मामा कैलास सोनवणे यांचा आप्पाचा ढाबा म्हणून हॉटेल आहे. या हॉटेलजवळ सोपान जेवणासाठी थांबला. जेवण आटोपल्यानंतर देवगावकडे जाण्यासाठी निघाला असता, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. डॉ. सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषित केले.

ज्या अपघाताचे कळाले, तो भाच्याचाच निघाला

काही वेळाने बामणोद येथून कैलास सोनवणे जळगावात पोहचले. त्यांना सोपान हॉटेलवर येवून गेल्याचे कळाले. याचदरम्यान एकाने विद्यापीठाजवळ अपघात झाल्याची माहिती दिली. कैलास सोनवणे यांनी घटनास्थळ गाठले असता, उभ्या असलेल्या दुचाकीवरुन त्यांचा भाचा सोपान याचाच अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यासह त्यांचे मोठे भाऊ वासुदेव सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालय गाठले

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेखर जोशी, निलेश पाटील, योगेश ठाकूर यांनी पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत सोपान यांच्या पश्चात आई जनाबाई, वडील सुभाष ÷उत्तम व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. वडील शेती करतात, आई सुध्दा नेहमी आजारी असते, सोपान हा सुध्दा शेतमजुरी करत होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करुन तो पाळधी पोलिसात वर्ग करण्याचे काम सुरु होते.

अन् डॉक्टर रुग्णवाहिका चालकांवर बरसले

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघासह विविध ठिकाणी अपघातात जखमी अथवा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. रुग्णवाहिका चालक माहिती मिळताच घटनास्थळावर जावून कुणाचीही प्रतिक्षा न करता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवितात. अशाचप्रकारे आज अपघातानंतर तरुणाचा पडलेला मृतदेह रुग्णवाहिका चालकाने जिल्हा रुग्णालयात आणला. याठिकाणी डॉ. सचिन अहिरे तुम्ही कसा काय मृतदेह थेट उचलून आणला, पोलीस कुठे आहेत, या शब्दात ज्या चालकाने मृतदेह आणून सामाजिक दायित्व पार पाडले, त्याच चालकावर राग व्यक्त केला. याबाबत रुग्णवाहिका चालकानेही बोलतांना नाराजी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com