
जळगाव | प्रतिनिधी Jalgaon
कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मार्केटमधील गुळाच्या लाइनमधील धान्याच्या बारदानच्या दोन दुकानांचे कार्यालये चोरट्यांनी दि.१७ रोजी सायंकाळी ७ ते १८ रोजी सकाळी ६.३० वाजे दरम्यान फोडले. यात चोरट्यांनी रोकड लांबवल्यानंतर त्या दुकानांना आग लावली.
या घटनेत चोरट्यांनी एका दुकानात पाच हजार रुपये रोख लांबवले. तर त्या दुकानाला आग लावून एक लाखांचे नुकसान केले. तसेच दुसर्या दुकानात चोरट्यांनी १ एक लाख ६५ हजारांचा ऐवज लांबवला. तर एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे कागदपत्र व मालमत्ता जाळून नुकसान केले.
धान्याच्या बारदानचे नंदलाल जीवनराम राठी (दुकान नंबर ५०) आणि पुखराज प्रजापत (दुकान नंबर २९) या दोघं वेगवेगळ्या फर्मचे दोन कार्यालये चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी आत शिरुन रोकड लांबवून धान्य, फर्निचर, कागदपत्र आदी साहित्य मोठ्या प्रमाणात जाळून नुकसान केले. ही घटना सकाळी उघडकीस आली. तोपर्यंत आग विझतच होती. परंतु, व्यापार्यांनी परिसरातील टँकर बोलवून आग विझवली.
याबाबत व्यापारी नंदलाल जीवनराम राठी यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद झाली आहे.