जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त केलेल्या ट्रॅक्टरची चोरी करीत त्याचा रंग बदल करुन ते वापरत असलेला तडीपार सराईत गुन्हेगारांच्या रविवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

दोन वर्व्षांसाठी तडीपार असलेला संशयित आरोपी प्रवीण उर्फ मनोज रमेश भालेराव (वय 24) व त्याचा साथीदार पप्पू उर्फ मुकेश रमेश शिरसाठ (वय 22) दोघ रा. पिंप्राळा हुडको बौद्ध वसाहत हा शहरात चोरीचे ट्रॅक्टर घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, विजय पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे याचे पथक तयार करीत या संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना करीत तपासासाठी रवाना केले.

बी. जे. मार्केट परिसरातून घेतले ताब्यात

तडीपार प्रवीण भालेराव व मुकेश शिरसाठ हे दोघे बी. जे. मार्केट परिसरात ट्रॅक्टर लावून उभे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिसून आले. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपुस केली असता त्या दोघांनी हे ट्रॅक्टर गल्या वर्षभरापूर्वी कलेक्टर ऑफिसमधून चोरी केले असून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा रंग बदलविला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.