जळगाव - Jalgaon

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जळगव जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्ण शोध मोहीम 16 डिसेंबर 2020 पर्यंत राबविण्यात येईल. या आजारांच्या लक्षणांनी ग्रस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक 1 डिसेंबर, 2020 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते करण्यात आले. अभियान काळात सर्व शहरी व ग्रामीण भागातील पुरुष व स्त्रीयांची तपासणी आशा व पुरुष स्वयंसेवकामार्फत करण्यात येईल.

सर्वेक्षणात आढळलेल्या सर्व रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यात येईल. जेणेकरुन क्षयरोग/कुष्ठरोग शोध अभियान 2020-21 मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण/क्षयरुग्ण शोधुन उपचाराखाली आणले जाईल त्यामुळे समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णाचे प्रमाण कमी होईल.

तसेच मोहिमेमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या टिमकडुन तपासणी करुन घ्यावी व त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.इरफान तडवी व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जागतिक एडस दिनानिमित्त श्री. विनोद ढगे यांनी पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.