म्युकरमायकोसिसवर होणार महात्मा फुले योजनेतून उपचार

जिल्ह्यात 24 हजार करोनाबाधितांना लाभ; दीड लाखाचे विमा संरक्षण
म्युकरमायकोसिसवर होणार महात्मा फुले योजनेतून उपचार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत 996 प्रकारच्या पध्दतीवर उपचार केले जातात. करोनाचा देखील यामध्ये समावेश केला असून आजपर्यंत 24 हजार करोनाबाधितांवर या योजनेतून उपचार करण्यात आले आहे. तसेच आता येवू घातलेल्या म्युकरमायकोसिसचा या आजाराचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत कोविड साथरोग परिस्थितीमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्जिकल पॅकेजेस 11 व मेडिकल पॅकेजेस 8 मध्ये उपचाराची मुभा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत प्रति कुटुंब, प्रति वर्षी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

औषधेही उपलब्ध करुन देणार

म्युकरमायकोसिस या आजारातील उपचारामध्ये औषधी हा महत्वाचा भाग आहे. संबधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सदरची औषधे महागडी आहेत. जळगाव जिल्ह्यात ही औषधे (अ‍ॅफोटेरीसीन बी) शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयात पात्र लाभार्थीस शासनाकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

उपचारासाठी आधारकार्ड व रेशनकार्ड आवश्यक

शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू केली आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध आहेत.

या योजनेतंर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड आवश्यक असून या आजारावर मोफत उपचार केले जाणार आहे.

सोयी सुविधा असलेल्यां रुग्णालयांना मिळणार इंजेक्शन

म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणार्‍या व बाधित झालेल्या रुगांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुगणालयात पुरेशा सोयीसुविधा तसेच तज्ञ डॉक्टर असेल तरच या रुग्णालयांना उपचाराकरीता अ‍ॅफटोरेसीन बी इंजेक्शनचे वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहे. याबाबतची माहिती रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना देणे आवश्यक असून अशाच रुग्णालयांना इंजेक्शनचे वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com