व्यापारी आर्थिक आव्हानांच्या फेर्‍यात

लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद असल्याने मानसिक खच्चीकरण
व्यापारी आर्थिक आव्हानांच्या फेर्‍यात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना संक्रमणामुळे सर्वच हवालदिल झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून व्यवसाय ठप्प असल्यामुळे सर्वच व्यापारी आर्थिक आव्हानांच्या फेर्‍यात अडकले आहेत.

ब्रेक द चेनसाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता, कोरोना संक्रमण मंदावत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने शासनाने व्यापार्‍यांच्या अडीअडचणी समजून घेवून 1 जून पासून शिथिलता द्यावी. जेणेकरुन पुन्हा व्यापार्‍यांना शुन्यापासून आपला व्यवसाय करणे शक्य होईल. असे मत जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष, युसुफ मकरा यांनी व्यक्त केले.

गेल्या दीड महिन्यांपासून व्यापार बंद आहे. उत्पन्न पूर्णपणे बंद आहे. बँकांच्या हप्त्यावरील व्याज, लाईट बील, घरपट्टी, दुकान, गोडावूनच्या करावर व्यापार्‍यांना सुट देण्यात यावी. सर्वच व्यापारी लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहे. व्यापार्‍यांच्या अडीअडचणी समजून 1 जूनपासून व्यापार सुरु करण्याची शासनाने परवानगी द्यावी.

युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात की, कोरोनाची ही लढाई आपण सर्वांनी एकत्र येवून लढायची आहे. हे अगदी खरे असलेतरी, लढण्याची उर्मी ही केवळ आणि केवळ पोट भरले असेलतरच येवू शकते. त्यामुळे पुन्हा व्यवसाय पुर्ववत करावी. अशी अपेक्षा आहे. सरकार एकीकडे गर्दी करु नका. असे म्हणत आहे. तर दुसरीकडे निर्बंध लादले जात आहे. ठराविक वेळांसाठीच जर दुकाने उघडी ठेवलीतर गर्दी होईलच. त्यामुळे ही गर्दी टाळायची असेलतर तसेच व्यावसायिकांवर आलेले मोठे आर्थिक संकट टाळायचे असेल तर, व्यवसाय सुरु ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका युसुफ मकरा यांनी मांडली. बांधकाम आणि वाहतूक व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र बांधकामासाठी लागणारी सामुग्री सिमेंट, स्टिलची दुकाने बंद आहेत. या सर्व अडचणी सरकारने समजून घ्यायला हव्यात. ई-कॉमर्स चालू आहे. परंतू, व्यापार्‍यांची दुकाने बंद असल्याने ग्राहकी तुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भाजीपाला, किराणा, दूध या जीवनावश्यक गोष्टी माणसाला आवश्यक आहेत का? सह अस्तित्वाची संकल्पना आपण कधी समजून घेणार आहोत? असा प्रश्न मकरा यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे बंद असल्याने मानसिक खच्चीकरण होवू लागले आहे. बेरोजगारी, उपासमार अशा समस्या अधिक भेडसावू लागल्या आहेत. त्यामुळे आता, शासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करुन सर्वच व्यवसाय सुरु करायला पाहीजे. अशी मागणीही युसुफ मकरा यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com