जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

चॉकलेटचे आमिष देवून तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्या किशोर उर्फ पिंटू निंबा भोई (वय 38, रा. बेडरपुरा, नगरदेवळा, ता. पाचोरा) या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. कटारीया यांनी आज बुधवारी हा निकाल दिला.

किशोर भोई याने 26 मार्च 2019 रोजी घराशेजारी राहणार्या तीन वर्षाच्या बालिकेस चॉकलेट देऊन घरात बोलाविले. यानंतर घरात बालिकेवर अत्याचार केला. बालिकेच्या रडण्याच्या आवाजाने बालिकेची आईसह काही महिला किशोरच्या घराजवळ पोहचला.

आतून दरवाजा बंद होता. महिलांनी दरवाजा ठोठावल्यावर किशोर हा घरात विवस्त्र आढळून आला होता. महिलांना पाहताच त्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली होती. यावेळी बालिकेने तीच्या आईस संपुर्ण आपबीती कथन केली. यानंतर बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन किशोरच्या विरुद्ध अत्यावर व पोक्सोच्या कलमांनुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक झाल्यापासून आरोपी कारागृहातच

गुन्हा दाखल झाल्याच्या रात्रीच पाचोरा पोलिसांनी किशोरला हुडकुन काढत अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोप सादर केले. 29 नोव्हेंबर 2019 रोजी या न्या.आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात खटल्याला सुरुवात झाली.

अटक झाल्यापासून संशयित हा कारागृहातच होता. लॉकडाऊन काळात सुनावणी काही वेळासाठी थांबली होती. लॉकडाऊनंतर खटल्याला पुन्हा सुरूवात झाली. या खटल्यात सरकारपक्षाने एकूण 10 साक्षीदार तपासले. सरकारपक्षाचे अॅड. केतन ढाके यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवाद अन् साक्षीदार व पुरावे ग्राह्य धरत न्या. कटारिया यांनी संशयित किशोर याला अत्याचाराचे कलम 376 (ए) (बी) व पोक्सो कायद्याचे कलम 3, 5, 7, 9 (एम) या कलमांन्वये दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेप व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.