बोदवड : ढगफूटीतील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी
जळगाव

बोदवड : ढगफूटीतील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Ramsing Pardeshi

बोदवड - (प्रतिनिधी) Bodwad

तालुक्यातील सुरवाडे बुद्रूक व खुर्द या दोन्ही गावांना जोरदार पावसाने झोडपले आहे, वेगाने पाऊस पडल्याने ढगफूटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये परीसरातील अनेक शेतकऱ्यांचे पशुधन आणि शेतशिवारातील पिकांचे नुकसान झाले आहे.

सदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तात्काळ मिळावी यासाठी बोदवड पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. व शेतकऱ्यांना शासकीय पातळीवर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. परिसरातील आजूबाजूच्या गावामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन अशी परिस्थिती असतांना शेतकर्यांवर 'ढगफूटीने' आस्मानी संकट कोसळले आहे. या वेळी नुकसानग्रस्त परिसरात सरकसकट पिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे पंचनामे करुन मदत मिळावी अशी मागणी सभापती किशोर गायकवाड यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सचिन राजपूत उपस्थित होते.

सुरवाडे बुद्रूक व खुर्द या दोन्ही गावांना जोरदार पावसाने झोडपले असून पावसाची शक्यता १२० मिमी च्या आसपास वर्तवण्यात आल्याने ढगफूटीचा प्रकार समोर आला, सुरवाडे बुद्रक व खुर्द या दोन्ही गावांना ढगफूटीचा तडाखा ८१ हेक्टर क्षेत्राला बसला आहे. यांत १ बैल मृत तर २ बैल जखमी झाले आहेत. यांत काही शेतकर्यांचे पशूधन बेपत्ता झाल्याची शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे.

यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान गृहीत धरता कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी लवकरात लवकर सर्व नुकसानग्रस्त पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे पंचनामे करावेत. तसेच पिकांचे पंचनामे करताना केवळ जास्त पाऊस पडलेल्या क्षेत्रात ज्या पिकांचे नुकसान झाले त्याचेच पंचनामे न करता ; सरसकट नुकसान झालेल्या पिकांचा समावेश पंचनाम्यामध्ये करावा अशी मागणी सभापतींनी केली आहे. यावेळी नुकसानग्रस्तांना सरकारी स्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com