क्रोबा अन् मांजरीच्या लढाईचा थरार

वन्यजीव संस्थेने सर्पाला केले अधिवासात मुक्त
क्रोबा अन् मांजरीच्या लढाईचा थरार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रात्री साडेतीनची वेळ.. घरातील सर्व जण गाढ झोपेत.. मुलाला मांजरीच्या फिस्करण्याचा आवाज... समोर मांजर आणि क्रोबा यांच्या लढाईचा थरार... घरातील सर्वच जण भयभीत.. ही घटना पिंप्राळ्यातील प्रशांत चौकात राहणार्‍या अनंत कोळी यांच्या निवासस्थानातील.. तेवढ्यात सर्पमित्र पोहचले.. अन् कोळी कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

पावसाळ्यात सर्प सुरक्षित अधिवास शोधत असतात त्याच बरोबर रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. गेल्या महिना भरात नागरिकांच्या घरात विषारी सर्प आढळून येत आहे. त्यातही जमिनीवर झोपलेल्या नागरिकांच्या अंथरुणात सर्प आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. त्या मुळे नागरिकांनी जमीनीवर झोपणे टाळावे.

रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक

शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत चौकात अनंत कोळी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सर्व कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अचानक पलंगावर झोपलेल्या मुलाला मांजरीच्या फिस्करण्याच्या आवाजाने जाग आली आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे अवसान गळाले.

कुटुंबातील चार जण जमिनीवर झोपलेले होते. याचवेळी त्यांच्या जवळ घरातील पाळीव मांजर अंगावरचे सगळे केस ताठ करून फिस्करत होती मधेच फूस असा आवाज येत होता. घरात अंधार असल्याने काय होत आहे हे कोणालाच कळत नव्हते मात्र घरातील अंधूक प्रकाशात दिसलेले दृश्य अत्यंत भयानक होते.कारण मांजराच्या समोर काळरात्र बनून आलेला विषारी क्रोबा जातीचा नाग होता.

मुलाने जोरात ओरडत सगळ्यांना उठवले भीतीने सगळ्या कुटुंबाची गाळण उडाली.

अन् सर्पमित्राने घेतली धाव

इकडे नाग आणि मांजराची लढाई सुरू असतांनाच काय करावे ते समजत नव्हते. याचवेळी सर्पमित्राला फोन लावून माहिती मिळताच त्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्याच भागातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना बोलवण्यासाठी धाव घेतली सोनवणे देखील आपले सहकारी अजय साळवे हे ताबडतोब घटनास्थळी पोहचले. तो पर्यंत मांजर हवालदिल झाली होती सोनवणे यांनी कुशलतेने कोब्रा आपल्या ताब्यात घेतला आणि कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

अनंत कोळी यांनी गणेश सोनवणे यांचे आभार मानत वन्यजीव संरक्षण संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच पावसाळ्यात जमिनीवर झोपणे टाळा , स्वछता ठेवा, असे सांगत सर्पमित्र जखमी नागाला घेऊन बाहेर पडले कोब्रा ला फारशी उपचाराची गरज नसल्याने मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांना माहिती देत तात्काळ सुरक्षित अधिवासात मुक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com