मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार
जळगाव

मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार

अनेकांना दिली धडक; एक जण गंभीर जखमी

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

मद्यधुंद कंटेनरचालकाने रविवारी दुपारी नेरी ते जळगाव दरम्यान भरधाव वाहन चालवून अनेक वाहनांना धडक दिली. यात एक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्या कंटनेरचालकास शहर पोलिसांनी पकडले. त्यास नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

केमिकल खाली करुन मलकापूरहून निघालेला कंटेनर (क्र.एमएच २३ एयू) मुंबईकडे जात होता. परंतु, कंटेनरवरील चालक भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय ३९, रा. कर्र्‍हे वडगाव, ता.आष्टी जि.बीड) याने दारुच्या नशेत असताना नेरीजवळ काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे संबंधित व काही इतर वाहनचालकांनी त्याचा पाठलाग केला.

काही जण पाठलाग करीत असल्याचे कंटेनरचालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने घाबरुन कंटेनर भरधाव पळविले. यात त्याने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली, कंटनेर जळगावात शिरला. यावेळीही त्याने अजिंठा चौफुली ते चित्रा चौकातून रेल्वे स्टेशन दरम्यान सुसाट वेगाने कंटनेर चालविला.

याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे गणेश शिरसाळे, अक्रम शेख रतन गिते, सुधीर साळवे, संजय झाल्टे यांनी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनरचालक भाऊसाहेब खांडवे यास ताब्यात घेतले. नंतर त्यास तपासकामी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com