जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रास्तभाव दुकानांमधून धान्याचे वितरण वितरण करण्यात येते. याचा लाभ सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारा प्राधान्य गट व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरमहा देण्यात येतो.

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रेशन लाभ घेतलेला नाही तसेच एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे, अशा अपात्र रेशनकार्डधारकांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न रेशनकार्डधारकांचे शिधापत्रिका लाभ रद्द करण्यात येणार आहे.

समिती गठीत

जिल्ह्यात एकूण 6लाख, 09हजार, 912 रेशनकार्ड आहेत. त्यामध्ये प्राधान्य गट केशरी शिधापत्रिका धारक 4 लाख 76 हजार 491, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पिवळे रेशनकार्डधारक 1 लाख, 33 हजार, 421 व पांढरे रेशनकार्डधारक 74हजार, 903 इत्यादी रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. शासन परिपत्रकानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकार्यांमार्फत पत्राव्दारे सूचित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अपात्र रेशनकार्ड शोधमोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच ही समिती गठित करण्यात येणार आहे.
सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी