
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एक तरुण कांताई बंधार्याच्या परिसरात कुटुंबियांसोबत फिरायला गेला असता पाय घसरल्याने तो गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाण्यात पडून बुडाला. त्याचा शोध घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस व इतर नागरिक करीत होते.
पाळधी येथील मुकेश मोरे (वय २२) हा तरुण जैन इरिगेशन कंपनीत एसडब्ल्यूआर इलेक्ट्रिक विभागात नोकरीला आहे. सध्या चांगल्या पावसामुळे कांताई बंधार्याच्या परिसरात निसर्ग सौंदर्य खुलले आहे. या निसर्गरम्य परिसरात मुकेश हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत मोटारसायकलने फिरायला गेला. या कुटुंबीयांनी बंधार्यावरील नयनरम्य परिसर न्याहळला.
त्यानंतर त्यांनी दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला. मुकेश जेवणाचा डबा धुण्यासाठी बंधार्याच्या किनार्यावरुन खाली उतरला. या वेळी त्याचा पाय घसरल्याने तो वाहत्या पाण्यात बुडाला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. पती पाण्यात पडून वाहत असल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेबाबत कळताच जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच सोपान पाटील, पाळधी बुद्रूक येथील सरपंच चंद्रकांत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर, तसेच पाळधी दूरक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घतली.