दहावीत शिकणार्‍या दोन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
जळगाव

दहावीत शिकणार्‍या दोन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

वाघोदे शिविरातील घटना : दोन्ही मुले सामान्य शेतकरी कुटुंबातील

Ramsing Pardeshi

अमळनेर (प्रतिनिधी) - Amalner

तालूक्यातील लोंढवे गावाजवळील वाघोदे शिविरामध्ये असलेल्या 20 फूट खोल नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणार्‍या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सूमारास घडली. या घटने मुळे कूटूंबावर दूखःचा डोंगर कोसळला तर गावावर शोककळा पसरली. या घटनेत त्यांचा तिसरा मित्र मात्र सुखरूप बचावला आहे.

तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश बळीराम देसले ( वय 15) व हितेश सुनील पवार (वय 15) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र वाघोदे शिवारातील नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे या नाल्यात पोहत असताना भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही मित्र 15 ते 20 फूट खोल पाण्यात गेले. मात्र दुर्दैवाने दोन्ही मित्रांचा पाय पाण्यात अधिकच खोल गेला. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून पाण्याच्या बाहेर असलेला त्यांचा मित्र जयवंत याने ओरड ठोकली परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीच आले नाही. म्हणून त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच कैलास खैनरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुले असून भावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी आहेत त्यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहिण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com