सावखेडा ता.रावेर- प्रतिनिधी Raver

लोहारा येथील सुक्या नदीच्या पुलावर लोहारा गावाच्या जवळ शेतातून शेतमजूर महिला आणि पुरुष ट्रॅक्टर मध्ये घरी येत असतांना सुक्या नदीच्या पुलावर असलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे अचानक ड्रायव्हर चा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला व ट्रॅक्टर थेट पुलावरून खाली कोसळले व ट्रॅक्टर मध्ये असलेले शेतमजूर ट्रॅक्टर खाली दाबले गेले.

सुकी नदीवरील पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे ट्रॅक्टरचा हा अपघात झाला असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. यामध्ये किमान २० ते २५ महिला शेतमजूर होत्या. त्यामध्ये तीन महिला यांना गंभीर दुखापत झालेली आहे असून त्यांना फैजपूर येथील खाचणे एक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केलेले आहे व काही महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कुंभारखेडा येथील खासगी दवाखान्यांमध्ये औषध उपचार तसेच प्राथमिक उपचार सुरू केले.

गेल्या अनेक दिवसांपासून या पूलाची ही अवस्था खराब झाली आहे. त्या पुलाविषयी लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी असंवेदनशील दिसून येत असल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती विषयी तक्रारी करूनही सदर अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच सदर अपघाताचा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. या लोहारा जवळील पुल व रस्ता याविषयी लोहारा येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला होता. या पुलावरील अपघाताची शक्यता सर्व पत्रकारांनी आपापल्या दैनिकांमधून याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. तसेच अपघाताचीही शक्यता वर्तवली होती, त्या प्रकारे या अपघातास जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये बोलला जात आहे.

तरीही लोकप्रतिनिधी कानाडोळा करत आहेत सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही ,तरी हा पूल व रस्ता दुरुस्त करण्यात यावा ,अशी मागणी येथील ग्रामस्थ व जखमी च्या नातेवाईकांनी केली व लोकप्रतिनिधीं विषयी तीव्र संताप व्यक्त केला.

सदर अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी कर्तव्य दक्ष तत्परतेने घटनास्थळी पोलिस टिम रवाना केली, यांत पी एस आय राजेंद्र पवार, पो.काॅ. मेहरबान तडवी, युसूफ तडवी, देवेंद्र पाटील, यांनी ताबडतोब जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने पुढिल उपचारांसाठी रवाना केले, यांमध्ये महिला शेतमजूर विंमल बाई प्रकाश महाजन, सुनिता ज्ञानेश्वर महाजन, शरीफा मेहमूद तडवी, इरशाद गफूर तडवी यांना जबर दुखापत झाली असून हरकोबाई नामदेव पाटील, रिना कुष्णा बेलदार, जयश्री सोपान पाटील, मंगला बाई समाधान पाटील, सिमा संतोष पाटील, शारदा संतोष बेलदार, छाया ज्ञानेश्वर पाटील, शुभांगी योगेश बेलदार ,सागरबाई संजय भालेराव, सुनंदा बाई रमेश बेलदार, लताबाई भावलाल बेलदार, सर्व कुंभारखेडा येथील शेतमजूर महिला आहेत.