जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पाच जणांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या या पथकाने संशयित जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर या फरार संशयितांसह अटक करण्यात आलेल्या विवेक ठाकरे, महावीर जैन व इतर संशयितांच्या शहरातील विविध बँकांमध्ये असलेल्या खात्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

तसेच झंवर याच्या कार्यालयातील चार कर्मचार्यांचे तर इतर दोन अशा सहा जणांचे जबाब नोंदविले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काही ठेवीदार तसेच बीएचआरची मालमत्ता खरेदी करणारे तसेच खरेदीसाठी निविदा भरणारेही पथकाच्या रडारवर असून त्यांचेही जाबजबाब नोंदविले जाणार आहे.

दोन दिवसात 6 जणांचे जबाब नोंदविले

पुण्यात डेक्कनसह विविध पोलीस ठाण्यात बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात सुरु असलेल्या तपासासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व तीन कर्मचारी अशा पाच जणांच्या जळगावात दाखल झाले आहे.

पथकाने गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित सुनील झंवर याच्या खान्देश कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कार्यालयातील चार कर्मचार्यांचे जळगावातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब नोंदविले. तर शनिवारीही आर्थिक गुन्हे शाखेच्याच कार्यालयात इतर दोन जणांचे जबाब नोंदविले आहे. याचवेळी पथकातील इतर कर्मचार्यांनी झंवर, कंडारेसह ठाकरे व इतर संंशयितांच्या बँक खात्यांची विविध बँकांमधून माहिती संकलित केली.

मालमत्ता खरेदी करणार्यांसह थकबाकीदारांचेही नोंदविणार जबाब

बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा रुपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपहाराची या गुन्ह्याची व्यापी लक्षात घेवूनच त्यानुसार अंत्यत बारकाईने पुराव्यांचे पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून संकलन केले जात आहे. यापुर्वीच पथकाने दोन गाड्याभरुन संगणक व इतर कागदपत्रे असे पुरावे जप्त केले आहे.

आता दाखल झालेले पथक दहा ते 15 दिवस जळगावात ठाण मांडून असून यादरम्यान ज्या लोकांनी बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता खरेदी केलेली आहे, अशांसह थकबाकीदारांचेही जाब जबाब नोंदविले जाणार आहेत. तसेच मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा भरणार्यांचीही चौकशी केली जाणार आहे. तसेच थकबाकीदार, साक्षीदार व तपासात जे नावे निष्पन्न होतील, त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. यात काहींना आज पथकाकडून जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याबाबत नोटीसही बजाविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयातही नोंदी तपासणार

पोलिसांनी केलेल्या तपासात मालमत्ता खरेदी विक्रीतही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. यात बनावट वेबसाईटच्या माध्यमातून तसेच अधिकृत वेबसाईटवरील निविदांच्या माध्यमातून बीएचआरच्या ज्या मालमत्ता खरेदी व विक्री झालेल्या आहेत. या मालमत्तासह खरेदी करणारे व निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्यात आहेत. त्यामुळे या सर्व मालमत्तांची दुय्यम निबंधक कार्यालयातही नोंदी तपासल्या जाणार आहेत.

संशयितांची आता जामीनासाठी हायकोर्टात धाव

बीएचआर प्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम साखंला, सुजीत वाणी, यांच्यासह कंडारेचा चालक कमलाकर भिकाजी कोळी यास अटक करण्यात आली. तर मुख्य संशयित जितेद्र कंडारे व सुनील झंवर फरार आहेत. दरम्यान, अटकेतील संशयितांचे जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर संशयितांपैकी काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर मंगळवारी कामकाज होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.