जुने बि.जे.मार्केटमध्ये सीलची कारवाई टळली

कारवाईस विरोध ; मनपा उपायुक्त आणि गाळेधारकांमध्ये वाद
जुने बि.जे.मार्केटमध्ये सीलची कारवाई टळली

जळगाव - Jalgaon

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या जुने बी.जे. मार्केटमध्ये गाळे सील करण्याच्या कारवाईसाठी महापालिकेचे उपायुक्त गेले होते. ही कारवाई करतांना येथील गाळेधारकांनी विरोध केल्यामुळे मनपा अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला. अखेर एका गाळेधारकाने तात्काळ दोन लाखांचा धनादेश दिल्यामुळे महापालिकेचे पथक कारवाई न करता परतले.

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या १८ मार्केटमधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र अवाजवी बील दिल्याचा आरोप करत गाळेधारक थकबाकी भरण्यास विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शुक्रवारी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, अधीक्षक नरेंद्र चौधरी, गौरव सपकाळे यांच्यासह पथक कारवाईसाठी जुने बी.जे. मार्केटमध्ये गेले होते. कारवाई दरम्यान, संबंधीत गाळेधारकांनी दोन लाखांचा धनादेश दिल्यामुळे पथक कारवाई न करता, माघारी परतले. दरम्यान, कोविडच्या पार्श्‍वभूमिवर थकबाकीची पुर्ण रक्कम न भरता, किमान निम्म्या रकमेचा भरणा करावा. अशी सूचना उपायुक्त वाहुळे यांनी केली.

कारवाई दरम्यान गोंधळ
महापालिकेचे पथक जुने बी.जे. मार्केटमध्ये कारवाईसाठी गेले होते. मात्र यावेळी येथील गाळेधारक तथा गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी राजेश कोतवाल, विलास सांगोरे यांच्यासह गाळेधारकांनी कारवाईस विरोध केला. यावेळी गाळेधारक आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये वाद होवून गोंधळ निर्माण झाला होता. गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलीस पोहचले आणि गर्दीला पांगविले.
गाळेधारक शिष्ट मंडळाची उपायुक्तांसोबत चर्चा
गाळेधारक शिष्ट मंडळासह त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेत येवून उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा केली. सद्या पुरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्ही जावू शकत नाही. शासन स्तरावरुन जोपर्यंत तोडगा निघणार नाही. तोपर्यंत कारवाई करु नये. अशी मागणी गाळेधारकांनी यावेळी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com