डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातून उपचारादरम्यान कैदी पळाला

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातून उपचारादरम्यान कैदी पळाला

अवघ्या तासाभरातच शेतातून केली अटक

जळगाव -Jalgain

जिल्हा कारागृहातून उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलेला कैदी जोसेफ राजू अब्राम्ह हा रुग्णालयातून पोलिसांच्या रखवालीतून पळाल्याची धक्कादायक घटना २१ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. पळाल्यानंतर कैदी या परिसरात एका ऊसाच्या शेतात लपलेला होता. पोलिसांनी हुडकून काढत काही तासातच त्याला अटक केली. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात कैदी जोसेफ राजू अब्राह्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कैदी पळाल्याच्या घटनेची वाच्यता होवू नये म्हणून पोलिसांनी गोपनीयता पाळली होती. त्यामुळे तब्बल पाच दिवसांनंतर सोमवारी सायंकाळी समोर आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २० एप्रिल रोजी कैदी जोसेफ अब्राम्ह याला उपचारासाठी जळगाव -भुसावळ रोडवरील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. यावेळी इतरही काही कैदी होते. कैदी अब्राम्ह याची कोरोनाची चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती. मात्र कैद्याला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यास रुग्णालयातील आपातकालीन विभागात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी पोलीस मुख्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव तसेच पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांची ड्युटी होती. यादरम्यान दोघेही कर्मचारी कैदी आहे की नाही हे पाहण्यासाठी दोन ते तीन वेळा वार्डात जावून तपासणी करत होते. दुसर्‍या दिवशी २१ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास यास कर्मचारी वार्डात पाहण्यासाठी गेले असता तो बेडवर मिळून आला नाही. रुग्णालयात विचारपूस तसेच शोध घेतल्यावर कैदी हा मिळून न आल्याने तो पळून गेल्याची खात्री झाल्यावर ही बाब पोलीस मुख्यालय तसेच नशिराबाद पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याच अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी रुग्णालय गाठले. व पळून गेलेल्या कैद्याचा शोध सुरु केला. पोलिसांच्या ताफ्याने रुग्णालयाच्या परिसरातील शेतांमध्ये कैद्याचा शोध घेतला. यादरम्यान एका ऊसाच्या शेतात कैदी अब्राम्ह हा लपलेला होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com