जिल्ह्यात आता भुमिगत वाहिन्यांव्दारे होणार वीजपुरवठा

जिल्ह्यात आता भुमिगत वाहिन्यांव्दारे होणार वीजपुरवठा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जीर्ण होउन वाकलेल्या वा झिजलेल्या सिमेंट तसेच लोखंडी खांबांवरील वीजवाहक तारा पडून अनेक वेळा दुर्घटना झाल्या आहेत.

पावसाळ्यात वारावादळ अथवा चक्रीवादळांमुळे वीजवाहिन्यांवर झाडे कोसळून विजेच्या खांबांसह वीजवाहक तारा तुटून नुकसान झाल्याने वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होतो. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासह देखभाल-दुरुस्तीसाठी आजवर महावितरणचा मोठ़या प्रमाणावर निधी खर्च झालेला आहे. यावर उपाय म्हणून जिल्हयात नियोजीत ठिकाणी दिड ते तीन किलोमीटर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जास्तीत जास्त लोकवस्तीच्या परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दिपक कुमठेकर, मुख्य अभियंता. महावितरण जळगांव.

यात जीवीत व वित्तहानी देखिल झाली आहे. या दुर्घटना रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाकडून वीज वितरण वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी एकात्मिक उर्जा विकास अंतर्गत जिल्हयाला उच्च दाब वाहिन्यांसाठी 5कोटी, 6लाख तर लघुदाब वाहिन्यांसाठी 3 कोटी, 26 लाख असे एकूण 8 कोटी, 32 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

वादळ वार्‍यांमुळे वा तारा जीर्ण झाल्यामुळे हा धोका जास्त असल्याने येथील उच्च व लघुदाब वीजवाहक तारा भूमिगत केल्या जाणार असल्याचे महावितरण सुत्रांनी सांगितले.

जिल्हयात पारंपरिक पद्धतीने लोखंडी वा सिमेंटच्या खांबांवरून विज वितरण असुन बरेच खांब जुने जीर्ण आहेत. त्यात तारांचा भार न पेलवल्याने खांब वाकलेले असून तारा लोंबकळत असल्याचे चित्र बर्‍याच ठिकाणी दिसते.

या लोंबकळणार्‍या तारा तुटून जीवीत हानी देखिल झालेली आहे. पावसाळ्यात सोसाट़याच्या वार्‍यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडून आग लागण्याचा देखिल धोका निर्माण होउन अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो.

यासंदर्भात महावितरणकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेउन शहरी भागांतील वीजवाहक तारा भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी जळगाव मंडळात एकात्मिक उर्जा विकास योजना फेज 1 आणि 2 अंतर्गत जळगाव विभागात 2.7, भुसावळ व जामनेरसाठी 10.35, धरणगाव व चोपडासाठी 5.1, पाचोरा व पारोळासाठी 4.75, रावेर फैजपूर व सावदासाठी 4.45किलोमिटर अंतरासाठी उच्चदाब भुमिगत वीज वाहिन्यांसाठी 5कोटी 6लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय भुसावळ व जामनेर साठी 8, रावेर सावदा फैजपूरसाठी 13.17, चाळीसगावसाठी 2किमी, पाचोरा व पारोळासाठी 0.6 किलोमिटरच्या लघुदाब वाहिन्यांसाठी 3कोटी 26लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय चाळीसगांव आणि धरणगांव विभागातील अमळनेरसाठी देखिल प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com