जळगावातील करोना रुग्णांची संख्या चिंताजनक-देवेंद्र फडणवीस

नॉन कोविड रुग्णांचे होताय हाल
जळगावातील करोना रुग्णांची संख्या चिंताजनक-देवेंद्र फडणवीस

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. करोना रुग्ण शोधण्यासाठीच्या टेस्टींगचा ॲव्हेरेज कमी आहे. त्यामुळे टेस्टींगचे प्रमाण तातडीने वाढवून अंबुलन्सची संख्याही वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होवून त्यांचे उपचारासाठी हाल होत आहे, अशी खंत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बुधवारी रात्रीपासून जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली.

रुग्णांची संख्या, त्यांच्यावरील औषधोपचार, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, उपाययोजना, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आदीबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली. फडणवीस आणि दरेकर यांनी रुग्णांच्या वॉर्डाकडे जावून परिस्थितीचे अवलोकन केले.

रिपोर्ट २४ तासात मिळावा

फडणवीस आणि दरेकर यांनी कोविड रुग्णालयानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला.

‘गोदावरी’बाबत तक्रार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यामुळे येेथे सध्या नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत नाही. नॉन कोविड रुग्णांसाठी गोदावरी मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

परंतु, ते रुग्णालय शहरापासून लांब आहे. तेथे रुग्णांना येणे-जाणे अथवा त्यांना ने-आण करणे त्रासदायक होत आहे. तसेच या रुग्णालयावर प्रचंड खर्च होऊन देखील त्या तुलनेत रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही, अशी तक्रार अनेक लोकप्रतिनिधींची आहे.

त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील एका विभागात नॉन कोविड रुग्णांची तपासणी, त्यांना दाखल करणे, विविध चाचण्या करण्याबाबतची सोय व्हावी, असे फडणवीस यांनी सांगितले.

सत्ताधारी फक्त घरात बसून करोनाच्या काळात फडणवीस यांच्या दौर्‍यासंदर्भात सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी टीका केली आहे.

फडणवीस राज्यात दौरा करुन परिस्थिती बिघडवू पाहत आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात फडणवीस राजकारण करीत असल्याचा आरोप सत्ताधार्‍यांमधील काही नेत्यांचा आहे.

यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, सत्ताधारी फक्त घरात बसून आहे. त्यांना कोरोनासंदर्भात नागरिकांची काळजी दिसत नाही. आम्हाला नागरिकांची चिंता असल्यामुळे आम्ही दौरा करुन परिस्थिती समजून घेतो.

यात संबंधिताना प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत सांगत आहोत. जनतेच्या भल्याचे राजकारण करतोय. धार्‍यांच्या टीका निरर्थक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com