जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील सम्राट कॉलनीतील गवळीवाड्यातून खेळतांना हरविलेली तीन वर्षाची मुलगी हरविली. हरविलेली मुलगी नागरिकांच्या सतर्कतेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचली.

मुलीच्या तोंडून पडणार्या गायी, म्हशी या शब्दांवरुन अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी मुलीचे पालक हुडकून काढले. व तिला सुखरुप पालकांच्या स्वाधीन केले. हरविलेली मुलगी काही तासातचस सुखरुप मिळाल्याने मुलीच्या पालकांना अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी ठरविले तर काहीही होवू शकते, याचाही प्रत्यय यावेळी आला. रविवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

वर्दीमधील दर्दी स्वभावाची प्रचिती

सम्राट कॉलनीतील गवळीवाड्यातील योगेश मारुती गवळी यांची मुलगी रविवारी दुपारी अडीच वाजता गल्लीत खेळत होती. खेळताना ती चालत जावून थेट महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पोहचली. याठिकाणी नागरिकांनी या मुलीला बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती काहीच सांगत नव्हती. फक्त रडत होती. अखेर मुलीला नागरिकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोडले. महिला पोलीस कर्मचारी निलोफर सय्यद यांनी प्रेमाने जवळ घेत आस्थेवाईकपणे तिची चौकशी केली. निलोफर यांच्या प्रेमामुळे मुलीच्या तोंडून आमच्या घरी गाय व म्हशी आहेत तेथे आमचे घर आहे असे बोबड्या आवाजातील शब्द पडले.

गाय, म्हशी शब्दावरुन लागला पालकांचा शोध

गाय व म्हशी असलेले घर या तीन शब्दांवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कामाला लागले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, राकेश बच्छाव व अतुल पाटील यांनी मोबाईलमध्ये मुलीचा फोटो घेऊन शोध मोहिम राबविली.

यादरम्यान ज्या भागात गायी व म्हशी पालन करणारे लोक राहतात, अशा ठिकाणी चौकशी केली. तीन तासानंतर सदरची मुलगी ही सम्राटकॉलनीतील असल्याचे निष्पन्न झाले व पोलिसांची मेहनत फळाला आली. मुलगी योगेश गवळी यांंची आहे व ती हरविल्याचे समजले. त्यानुसार गवळी पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी हरविलेल्या मुलीला सुखरुप पाहून योगेश गवळी यांचे डोळे पाणावले होते. खाकीतील माणुसकीला सॅल्युट ठोकत त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे आभार मानले.