मनपा कोविड सेंटरच्या जेवणामध्ये अळ्या !
जळगाव

मनपा कोविड सेंटरच्या जेवणामध्ये अळ्या !

महासभेत शिवसेना होणार आक्रमक

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणार्‍या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळल्या असल्याने आयुक्तांनी याबाबत दखल घ्यावी असे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी स्पष्ट केले.

मनपा कोविड सेंटरबाबत गेल्या काही दिवसापासून सतत तक्रारी येत आहेत. या कोविड सेंटरच्या सफाईच्या टेंडरमध्ये घोळ, जेवणात अळ्या आढळतात, जेवणाच्या टेंडरमध्ये घोळ, यात काही मंडळींचा सहभाग याबाबत विरोधी पक्षनेते महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साफसफाई नित्याचीच पाहिजे मात्र तीही व्यवस्थित होत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी पाहणी केली असता त्यावेळी जेवण चांगले मिळत होते. मात्र त्यानंतर सामान्य लोकांना निकृष्ठ जेवण देण्यात येते, नाश्ताही पूर्ण दिला जात नाही याबाबत ठेकेदाराला जाब विचारला पाहिजे, त्याच्या देयकातून कपात करा, त्याची चौकशी केली पाहिजे, एकतर सामान्य नागरिक कसे तरी जीवन जगत आहेत, कोणाला क्वचित त्रास होवू लागला की त्यास या सेंटरमध्ये आणले जाते व अशा प्रकारे हेळसांड केली जाते हे योग्य नव्हे.

हा प्रकार निंदनीय असून सामान्य जीवांशी खेळ करणारा आहे. या प्रकाराबाबत निश्‍चितच जाब विचारला जाईल, तसेच याप्रश्‍नी मनपाच्या महासभेत शिवसेना अधिक आक्रमक होईल असेही सूतोवाच विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com