त्या मयताची ओळखही पटली;चार मारेकरी गजाआड

रावेर पोलिसांनी २४ तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केल्याने,एसपींकडून ३५ हजाराचे पारितोषिक
पत्रकार परिषेदेत माहिती देतांना पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे
पत्रकार परिषेदेत माहिती देतांना पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे

रावेर|प्रतिनिधी Raver

बुधवारी झालेला खून हा गेवराई येथील २२ वर्षीय युवकाचा झाला असल्याचे निष्पन्न करून,तो येथील आंबेडकर चौकातील मारेकऱ्याची टपरी फोडण्याच्या प्रयत्नात असतांना आढळून आल्याने,गळा आवळून ठार केल्याची कबुली चौघांनी दिल्याने,तपासासाठी आव्हान ठरलेला खुनाच्या गुन्हाचा उलगडा अवघ्या २४ तासांत केल्याने,या कामगिरीसाठी एसपीकडून ३५ हजार रुपयांचे रिवार्ड जाहीर झाले आहे.

शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील गोवर्धन नगरातील भूतबंगल्याच्या मागे २५-३० वयोगटातील युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी रक्ताच्या थेरोळ्यात मिळून आला होता.याघटनेचा पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना गजाआड केले,मृतदेहाची ओळख पटण्यासाठी एकही पुरावा मारेकर्यांनी ठेवलेला नव्हता,याउलट त्याच्या पॅ्नट खिशात गर्भरोधक वापराचे साहित्य ठेवून खुनाला वेगळेवळण दर्शवून,दिशाभूल करण्याचा व तपास भरकवटण्याचा प्रयत्न केला होता.पण पोलिसांनी खात्रीशीर व विविध पुराव्यांचा अभ्यास करून अवघ्या २४ तासातच मारेकर्यांना बेड्या ठोकल्या.

या गुह्यातील मयत आणि आरोपी यांनी एकमेकांना याआधी कधी पहिले नव्हते हि बाब देखील स्पष्ट झाली आहे.पोलिसांनी आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा केल्याने,सपोनि शीतलकुमार नाईक यांना १० हजार व तपासासाठी राबणाऱ्या टीमला २५ असा एकूण ३५ हजार रुपयांचा रिवार्ड जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी घोषित केला आहे.गुरुवारी सायंकाळी पोलीस स्टेशनला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्क्रांत गवळी,उपाधीक्षक रायसिंग,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते.

शहरात आढळून आलेल्या मयताच्या अंगावर असलेल्या शर्टावरील टेलरच्या लेबलमुळे मयत औरंगाबाद येथील परिसरातील असल्याचा पोलिसांजवळ एकमेव पुरावा होता.या टेलरचा शोध घेण्यासाठी सपोनि शीतलकुमार नाईक व फिर्यादी पो.कॉ.सुरेश मेढे यांनी औरंगाबाद गाठून मयतची ओळख पटवण्यात यश मिळवले.

याआधी मंगळवारी रात्री १२ वा.पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुकेश तडवी यांनी मामाश्री हॉटेलवर चार संशयितांना पहिले होते. ते जण रात्री दोन वाजता गस्तीवर असलेल्या सपोनि शीतलकुमार नाईक यांना बिंबे पेट्रोल पंपाजवळ मिळून आल्याने,त्यांनी विचारपूस करून त्यांचे फोटो काढून घेतले होते.यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये यातील तिघे पहाटे चार वाजता घटनास्थळी जाऊन संबधित ठार झाला कि जिवंत आहे.हे पाहण्यासाठी गेल्याचे दृश्य पोलिसांनी मिळवले आहे.यासर्व घटनाक्रमाची जोडणी करून,पोलिसांनी शहरातील महेश विश्वनाथ महाजन,योगेश उर्फ भैया धोबी,विकास गोपाळ महाजन,विनोद विठ्ठल सातव यांना ताब्यात घेतल्यावर,झालेल्या कसून चौकशीत विनोद सातव याची आंबेडकर चौकातील पान टपरी मयत फोडण्याचा प्रयत्न करतांना मिळून आल्याने,त्याला मोटरसायकलीवर बसवून घटनास्थळी आणून मारहाणीने रक्तबंभाळ करून रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याने घटना उघडकीस आली आहे.

मयत झालेला युवक गेवराईचा

रावेरात बुधवारी आढळून आलेला मृतदेह बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या चिंतेश्वर गल्लीतील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय सौरभ गणेश राउत याचा असल्याचे निष्पन्न झाले.मयताच्या अंगावर असलेल्या शर्टाच्या कॉलरवर असलेले स्टीकर न्यू रिलायंस टेलर पैठण रोड,औरंगाबाद यावरून पोलिसांनी मयताची ओळख पटवली.दरम्यान तो नेहमी घरून ३-४ महिने बाहेर राहत असल्याने,त्याची हरवल्याची देखील नोंद नसल्याचे समोर आले आहे.

शीतलकुमार नाईक यांनी कौतुकास्पद कामगिरी

नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेले सपोनि शीतलकुमार नाईक यांची कामगिरी सुरवातीपासून चमकदार राहिली आहे.रावेर दंगलीत देखील त्यांनी साहसाने मॉप मध्ये शिरून दंगल रोखण्याचा प्रयत्न केला होता.या नंतर या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी त्यांनी गस्तीवेळी आढळून आल्याने,त्यांचे फोटो काढून ठेवले असल्याने,आरोपी निष्पन्न झाले.यामुळे त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन पोलीस अधीक्षक डॉ मुंडे यांनी १० हजार रुपये रिवार्ड त्यांना जाहीर केले आहे.

गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

या गुन्ह्यात असलेले भैया धोबी व महेश महाजन यांच्यावर याआधी देखील रावेर पोलिसांत गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल असल्याने,त्यांच्यावर अधिक संशय आधीच पोलिसांना आला होता.या चौघांनी खून केल्याचा कबुली जबाब पोलिसांना दिला आहे.यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com