जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथील ग्रामपंचायत कार्यालय फोडून चोरट्यांनी कार्यालयातील संगणक तसेच दवंडी देण्याचा स्पिकर लांबविल्याची घटना आज 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास समोर आली आहे.

शिरसोली येथील ग्रामपंचायत हे कार्यालय मंगळवारी सायंकाळी काम आटोपल्यावर बंद करण्यात आले. बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक चंद्रभान बारी, ज्ञानेश्वर पाटील, जुबेर पिंजारी, उमेश माळी, हे सर्व आले असता, कार्यालयाचे उघडे तर कार्यालयातील सर्व कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

पाहणी केली असता, कार्यालयातील संगणक तसेच स्पीकर चोरट्यांनी लांबविलेला असल्याचे दिसून आले. कर्मचार्यांनी याबाबत पोलीस पाटील श्रीकृष्ण वराडे यांना माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वापरलेले कुदळ, टॅमी, मोठा स्कूल ड्रायव्हर तसेच पान्हे असे साहित्य कार्यालयात मिळून आले.

माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसावद पोलीस दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षिक विशाल सोनवणे, राजेंद्र ठाकरे, निलेश भावसार या कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आज ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच निवड होती. व नेमकी आजच ही घटना घडल्याने कार्यालयातील मागील काळातील काही महत्वाचे रेकार्ड व नोंदी गहाळ करण्याचा कुणाचा डाव तर नाही, अशाप्रकारे तर्क वितर्क सुरु आहेत.

दरम्यान या ग्रामपंचायतीबाहेर असलेले एक पत्र्याचे दुकानही चोरट्यांनी फोडून त्यातूनही काही ऐवज लांबविला असल्याची माहिती समोर आली आहे.