जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था अथार्र्त बीएचआर पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी याच्यासह संचालक मंडळाने ठेवीदारांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे अवसायक जितेंद्र कंडारे याने सुद्धा ठेवीदारांना परवड करुन त्रास दिला. त्यामुळे रविवारी राज्याभरातील ठेवीदारांची ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये ठेवीदारांना न्याय हवा असेल तर केंद्र व राज्य सरकारला पार्टी करुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा नाशिक यांनी दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 ते 7.30 यादरम्यान ऑनलाईन मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन मीटिंगमध्ये नाशिक, मालेगाव, उस्मानाबाद, पुणे, येवला, परभणी, धर्मराबाद, सांगली यासह राज्यभरातील 250 ठेवीदार सहभागी झाले होते.

या ऑनलाईन चर्चेत अवसायक जितेंद्र कंडारे याच्याविषयी ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात आगपाखड केली. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा नाशिक यांनी सांगितले की, आज महाविकास आघाडीचे सरकार आहे. उद्या भाजप सरकार असेल. त्यामुळे राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतील. त्यामुळे राजकारणी लोकांच्या मागे न लागता आपल्या हक्काच्या ठेवी परत मिळविण्यासाठी राज्यभरातील ठेवीदारांनी संघटीत होऊन केंद्र व राज्य सरकारविरोधात याचिका दाखल करुन पार्टी करावे, असा निर्णय ऑनलाईन मीटिंगमध्ये घेण्यात आला.

राज्यभरातील सर्व ठेवीदारांनी सहभागी होऊन आंदोलन करण्यापेक्षा उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा यांनी केले. त्यासंदर्भात लवकरच महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांची मीटिंग नाशिक,सटाणा येथे घेण्यात येणार असल्याचे अशोक मंडोरे, गिरधर डाभी यांनी सांगितले.