तो नगरसेवक अखेर छ.शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक
जळगाव

तो नगरसेवक अखेर छ.शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक

शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागण्यास पाडले भाग

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला चाळीसगावातील त्या नगरसेवकाला जळगावच्या शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होवून माफी मागण्यास भाग पाडल्याचा प्रकार शुक्रवारी शहरातील कोर्ट चौकात घडला.

शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या बॅनरचा वापर स्वच्छता गृहाच्या आडोशासाठी केल्याचा जाब विचारल्याने चाळीसगावात एका तरुणाला घरात घुसुन भाजपाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

दरम्यान नगरसेवक चौधरी यांना अटक होवून सुटका झाल्यानंतर शुक्रवार दि.२४ रोजी न्यायालयीन कामासाठी चौधरी हे जळगावात आले असता, शिवप्रेमींना ते आल्याची भनक लागली. लागलीच काही शिवप्रेमींनी तेथे जमून त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची माफी मागा असे सांगून सुरुवातीला नगरसेवक चौधरी यांनी नकार दिल्याने काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अखेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात नगरसेवक चौधरी यांनी शिवाजी पुतळ्यावर नेवून नतमस्तक होत माफी मागण्यास भाग पाडले. दरम्यान या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा जमा झाला होता. मात्र तोपर्यंत नगरसेवक चौधरींसह शिवप्रेमी तेथून निघून गेले होते.

Deshdoot
www.deshdoot.com