जळगाव - Jalgaon

भर रस्त्यावर कार शिकणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील काव्यरत्नावली चौकात कार शिकत असताना नियंत्रण सुटल्याने वेगाने कार चौकातील झाडावर धडकल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.

सुदैवाने वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील तरुणांना दुखापत झालेली नाही. मात्र कार संपूर्ण चक्काचूर झाली असुन नुकसान झाले आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केली असल्याचीही माहिती मिळाली आहे

शहरातील नंदनवन कॉलनी येथे आर.बी.हिंगणेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाचे फोटोग्राफीचा व्यवसाय असुन काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला ऑफिस आहे. गुरुवारी ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. यादरम्यान हिंगणेकर यांचा मुलगा रक्षण हा शिकण्यासाठी घरुन त्यांची (क्रमांक एम.एच. १९ सी.झेड १५३२) ही कार घेऊन आला होता. शुक्रवारी पहाटेच्या उठल्यानंतर रक्षण हा त्याच्या सोबतच्या मित्रांसोबत तो काव्यरत्नावली चौक रस्त्यावर कार शिकत होता.

शिकताना एचडीएफसी बँकेसमोर रक्षणचा पाय अचानक ब्रेक करून रेसवर गेला. व कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार ही काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेलगत असलेल्या वृक्षावर जाऊन धडकली. दरम्यान धडक देताच कारमधील एअरबॅग उघडली त्यामुळेच कारमधील रक्षण सह त्याचे दोघे मित्र यांना कुठलीही दुखापत झाली नाही. कारमधून बाहेर उतरून रक्षण याने ही घटना त्याच्या वडिलांना कळविली.

धडक इतकी जोरदार होती की ज्या झाडाला धडक दिली होती त्या झाडाची काहीवेळाने कारवर भली मोठी फांदी तुटून पडली. अपघाताच्या मोठ्याने झालेल्या आवाजाने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्व नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.

महापालिका कर्मचार्यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी ट्रॅक्टरसह घटनास्थळ गाठले. याठिकाणी कर्मचार्यांनी झाडाची फांदी बाजूला करण्यासह खाजगी क्रेन मशीन बोलवुन त्याद्वारे कार रस्त्याच्या बाजूला केली. दोन महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केली असल्याची माहिती हिंगणेकर यांनी बोलताना दिली. तसेच मुलाकडे लर्निंग लायसन्स असून त्याच्या मित्राकडे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स आहे. त्यामुळे मुलगा रक्षणाला त्याचा मित्र कार शिकवत असताना हा अपघात घडल्याचेही त्यांनी सांगितले.

या अपघातात कारचा समोरील भाग संपूर्णपणे चक्काचूर झाला असून मागील बाजूच्या काचा फुटुन मोठे नुकसान झाले आहे. भर रस्त्यावर कार शिकण्याच्या या प्रकारात कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर जर कार झाडावर न धडकता रस्त्यावर फिरणाऱ्या एखाद्याला धडक देऊन मोठी दुर्घटना घडली असती असेही यावेळी गर्दी करणाऱ्या नागरिकांमधून बोलले जात होते .