जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी (अंकल) यांच्यासह 13 संचालक व एक मॅनेजर अशा एकूण 14 जणांविरुद्ध राज्यभरात 79 गुन्हे दाखल आहे. यावर आज जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता या 14 जणांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे. तसेच 3 मार्च पासून याप्रकरणी न्यायालयात दररोज सुनवाई होणार आहे.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी संचालक मंडाळासह मॅनेजरविरुद्ध राज्यभरात 79 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचे कामकाज जिल्हा न्यायालयातील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात सुरु आहे. आज 79 पैकी 75 प्रकरणांवर कामकाज झाले यात संचालकांसह मॅनेजर असे एकूण 14 जणांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने या संशयित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. 79 गुन्हयांपैकी 4 गुन्हे हे माळशिरस व सोलापूर याठिकाणी खासगी असल्याने त्यावर कामकाज झाले नाही. सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके तर संशयित आरोपीतर्फे अॅड. अकील ईस्माईल यांनी कामकाज पाहिले.

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

यापूर्वी संशयित आरोपींपैकी काही जणांनी जामीनासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केले होते. परंतू याठिकाणी देखील त्यांचे अर्ज फेटाळून लावले आहे. बीएचआर प्रकरणी पहिली तक्रार 2 जानेवारी 2015 रोजी रामानंद पोलीस ठाण्यात शिवराम चावदस चौधरी यांनी दिली. त्यानंतर 2 फेबु्रवारी सर्व संचालकांना अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून तेव्हापासून हे संचालक व मॅनेजर असे एकूण 14 जण कारागृहातच आहे.

या संशयितांचा फेटाळला जामीन

बीएचआरचे सर्वेसर्वा प्रमोद भाईचंद रायसोनी(अंकल), दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुतमल जैन, मोतीलाल ओंकार जीरी, यशवंत ओंकार जीरी, राजाराम काशिनाथ कोळी, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील, शेख रमजान शेख अब्दुल नबी, भगवान हिरामण वाघ, सुकलाल शहादू माळी, लिलाबाई राजू सोनवणे अशांनी आज न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.