संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जळगाव

संत मुक्ताई पालखीची ३११ वर्षांची परंपरा खंडित

Balvant Gaikwad

मुक्ताईनगर - आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे यंदाचे 311वे वर्ष असून इतक्या वर्षात प्रथमच कोरोनामुळे पालखी सोहळा आणि वारी खंडित झाली आहे. यामुळे मुक्ताबाई भक्त परिवारात नाराजी व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होणार्‍या 10 प्रमुख संतांच्या पालख्यांपैकी आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. मुक्ताबाईची पालखी खान्देशातून पंढरपुरात दाखल होत नाही तोपर्यंत कोणत्याही संतांची पालखी पंढरपूर नगरीत प्रवेश करत नाही. आधी मुक्ताबाई पालखीला तो मान दिला जातो. त्या पाठोपाठ ज्ञानदेव, सोपान व इतर भावंडांच्या पालख्या पंढरपुरात प्रवेश करतात.

यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. शासनाने पालख्यांऐवजी फक्त पादुकांना परवानगी दिली असल्याने आज मंगळवार, दि.30 रोजी ब्रह्ममुहूर्तावर एका लक्झरी बसने मुक्ताबाईंच्या पादुका घेवून संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज यांच्यासोबत 18 वारकरी पंढरपुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत दाखल होणार असल्याचे ह.भ.प.हरणे महाराज यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

संत मुक्ताबाईची पालखी तापीतीर ते भिमातीर अशी 650 किलोमीटर पायीवारी 34 दिवसात पूर्ण करते. यात जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातून ही पालखी पंढरपुरात दाखल होते. मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या प्रांतातील हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात, असे संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील व पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com