शासकीय सेवेत घ्या...अन्यथा 29 पासून सामूहिक रजेवर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा अधिष्ठातांना इशारा
शासकीय सेवेत घ्या...अन्यथा 29 पासून सामूहिक रजेवर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक प्राध्यापक करोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत.

या कामाची दखल घेवून अस्थायी स्वरुपातील सहाय्यक प्राध्यापकांनी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा 29 एप्रिल पासून सर्व सहाय्यक प्राध्यापक बेमुदत सामुहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा प्राध्यपकांनी अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यापासून सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती.

याबाबत सर्व माहिती मागवून प्रक्रिया देखील चालू करण्यात आली होती. मात्र पाठपुरावा करुनही कुठलाही निर्णय शासनाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापकांनी 2 नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन केले होते.

यादरम्यान 5 नोव्हेंबर 2020 रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी लवकरात लवकर सहाय्यक प्राध्यापकांचे समावेशन करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले होते.

यानंतर 15 एप्रिल रोजी पुन्हा आंदोलन करण्यात आले मात्र यानंतरही शासनाचा वेळकाढून पणा सुरु असून केवळ आश्वासन देण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमिवर आता पुन्हा 29 एप्रिल रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालकांना निवेदन

अस्थायी स्वरुपातील सहाय्यक प्राध्यपकांनी पुकारलेल्या बंदच्या निर्णयाला शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

त्यांनी आंदोलनाच्या इशार्‍याचे रविवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संचालकांना निवेदन पाठविले आहे.

यावेळी डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. इम्रान पठाण, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. सिद्धार्थ चौधरी, डॉ. धनश्री पाटील, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ नेहा चौधरी, डॉ अमित भंगाळे , डॉ मनोज पाटील, डॉ समीर चौधरी , डॉ प्रियंका पाटील , डॉ उत्कर्ष पाटील डॉ प्रदीप पुंड यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संचालकांना पाठविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com