जि.प.आरोग्य विभागातील तिघांवर निलंबनाची कुर्‍हाड

जि.प.आरोग्य विभागातील तिघांवर निलंबनाची कुर्‍हाड

सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडून कामचुकार कर्मचार्‍यावर कारवाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या गेल्या सहा वर्षांपासून रखडल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकट काळात फ्रंट वर्कर म्हणून काम करणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचा विषय वारंवार सांगूनही मार्गी लावला नाही.

प्रशासकीय कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत अखेर आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ सहाय्यक नितीन वारूळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर कनिष्ठ सहाय्यक फरीद पठाण यांचा प्रस्ताव शुक्रवारी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जि.प.आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. जि.प. आरोग्य विभागातील पदोन्नत्यांच्या विषयांवरून अखेर जि.प. सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला.

गेल्या पाच वर्षांपासून जि.प.आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्यांचा विषय रखडला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी यात दिरंगाई करीत असून त्यांच्यामुळे कामे रखडत असल्याचा मुद्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमदार यांनी गेल्या स्थायी समितीच्या सभेतही मांडला होता. तसेच कामचुकार कर्मचार्‍यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम सुद्धा दिला होता. कर्मचार्‍यांना वारंवार सांगूनही ते कामात दिरंगाई करीत असल्याने अखेर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.

यात कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांना निलंबित करण्यात आले असून वरिष्ठ सहाय्यक नितीन वारूळे यांच्या प्रस्तावरवरही लवकरच स्वाक्षरी करणार असल्याचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.तसेच कनिष्ठ सहाय्यक फरीद पठाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देणार असल्याचे डॉ. जमदार यांनी सांगितले.

वरिष्ठ सहाय्यक वारूळेंच्या पदोन्नतीला बसणार ब्रेक

जि.प.आरोग्य विभागात वर्षानुवर्षे पदोन्नती न करणे, शिकाऊ काळ मंजूर न करणे, बदल्यांबाबतची फाईल मार्गी न लावणे, प्रशासकीय कामात दिरंगाई असे ठपके ठेवून कनिष्ठ सहाय्यक नितीन वारूळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सीईओंना सादर केला आहे. तर वरिष्ठ सहाय्यक नितीन वारूळे यांनाही पदोन्नती मिळाली होती. मात्र, आता कारवाईमुळे त्याला ब्रेक बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच दोन कर्मचार्‍यांंना या विभागातून काढून घ्यावे, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमदार यांनी स्थायी समितीच्या सभेत केली होती.

मुख्यालयात ठाण मांडणार्‍यांची उचलबांगडी

जि.प.आरोग्य सेवकांचे काम हे सद्यस्थितीत लिपिकाचे नसून मुख्यालयात थांबवून ठेवलेल्या आरोग्य सेवकांना फिल्डवर पाठवा, असे आदेश सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेत दोन तर तालुकास्तरावर 7 आरोग्य सेवक मुख्य जबाबदारी न पार पाडता जळगाव जि.प.मुख्यालयात थांबून आहेत, असा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाकडून सीईओंना जाणार आहे. मुख्यालयात ठाण मांडणार्‍यांची आता उचलबांगडी करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com