रविंद्र लाठे

पहूर, ता.जामनेर - Jamner

चार महिन्यांपूर्वी जळगाव येथील मध्यवर्ती कारागृहातून दोन सहकाऱ्यांसमवेत पिस्तुलाचा धाक दाखवून फरार झालेल्या पहूर येथील बडतर्फ पोलिस सुशील मगरे यास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहूर पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. पहिल्यांदाच पहूर पोलीस स्टेशनला पी.आय.म्हणून रूजू झालेले राहूल खताळ व पहूर पोलीसांचे धडाकेबाज कामगिरी चे सर्वत्र कौतुकहोत आहे.

आज रविवारी दि.२९ पहाटे ४ वाजेच्या सुमारास सुशील मगरे हा पहूर कसबे येथील लेले नगर भागातील आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सापळा रचून त्यास शिताफीने अटक केली.

सिनेस्टाईल मारली उडी

सुशील मगरे लेलेनगर येथील राहत्या घरात वरती पत्र्याच्या खोलीत होता. पोलिसांनी दार ठोठावताच त्याने वरील मजल्यावरील आपल्या पत्र्याच्या घरातून सिनेस्टाईल पद्धतीने खाली उडी मारली.

पोलिसांनी घातली झडप

यावेळी त्याच्यासोबत त्याच्या जवळ बॅग होती. बाहेर पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावर झडप घातली. सुमारे १५ ते २० फूट उंचीवर असणाऱ्या खिडकीतून त्यांने उडी घेतल्याने त्याच्या हाताच्या पंजाला काहीसे खरचटले खिडकीतून उडी घेताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो मोटर सायकलला चावी लावेल इतक्यात पोलिसांनी त्यास पकडले.

त्याच्या जवळील बॅगमध्ये गावठी कट्टा, सुरा यासह ४ हजार रुपयांच्या रोख रकमेसह ४ ते ५ मोबाईलचे सिम कार्ड आढळून आले. पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पहूर पोलिस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोण आहे हा सुशील मगरे?

सुशील अशोक मगरे (वय-२५ वर्षे) हा पहूर – कसबे येथील लेले नगर भागातील रहिवासी असून मोठ्या जिद्दीने त्यांने तयारी करून तो पोलिस दलात सहभागी झाला. पोलीस झाल्यानंतर रावेर दंगल शालेय पोषण आहार योजनेतील खाऊ पकडणे यामुळे तो पोलीस दलात चांगलाच नावारूपास आला. मात्र २०१७ मध्ये त्याच्यावर रस्तालूट प्रकरणी गुन्हा दाखल झाला, पुढे पुणे येथे भरदिवसा नामांकित सोन्याचांदीच्या शोरूमवर सशस्त्र दरोडा टाकल्याने तो पोलिसांच्या हिटलिस्टवर आला. याप्रकरणी त्यास गुजरात मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्यास जळगाव येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

दि.२५ जुलै २०२०रोजी सुरक्षारक्षकांच्या कपाळावर बंदूक लावून तीन साथीदारांसह त्याने पलायन केले होते या प्रकरणातील तो प्रमुख सूत्रधार होता तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत होता मधल्या काळात तो साक्री, नवापूर, धुळे या भागात वावरत असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळी भल्या पहाटे चार वाजेच्या सुमारास येथे मोटरसायकलने आल्याचे गुप्त माहिती वरून पहूर पोलिसांनी पाळत ठेवली आणि पाच वाजेच्या सुमारास त्यास सिनेस्टाईल पद्धतीने पकडण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या पथकामध्ये पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख आदींचा या पथकात समावेश होता.

या पथकाने त्याचा अटक केल्यानंतर त्याच्या राहत्या घराची तपासणी केली. त्याच्या राहत्या घरी त्याची आई राहते. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू घरी आढळून आली नाही . याबाबत पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंडविधान संहितेच्या हत्यार कायदा कलम३ / २५,४ /२५ सह कलम ३७ / १ (३ ) चे उल्लंघन १३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.