जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद, महानगर, पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे.

क्षय, कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत कुष्ठ, क्षयरुग्ण शोधुन उपचाराखाली आणून समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहिममध्ये पथकाकडून तपासणी करुन घ्यावी.
डॉ. बी. एन. पाटील सीईओ, जि.प.जळगाव

जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचे सर्वेक्षण दि.1 ते 16 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील 43 लाख 69 हजार 966 पैकी 33 लाख 37 हजार 292 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणासाठी 2972 पथकांसह 630 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एक पुरुष व एक स्त्री असे एक पथक असून दररोज ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

आदिवासी भागातील वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात कुष्ठरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यांची मदत घेवून प्रभावी जनजागृती व या भागातील जनतेची 100 टक्के तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ जयवंत मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये म्हटले आहे.

शरीरावर न खाजवणारा न दुखणारा बधिर डाग अथवा चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, जाड कानाच्या पाळ्या, हाता-पायांना बधिरता, हाता पायांना मुंग्या येणे, चालताना पायातून चप्पल निसटून जाणे अशी कुष्ठ तर थुंकीतून रक्त पडणे, सात दिवसांच्या वर ताप व खोकला अशा प्रकारची क्षयरोगाची लक्षणे आहेेत. त्यामुळे रूग्ण शोधून त्यांच्यावर सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यामध्ये उपचार मोफत दिला जातो.

त्वचा व हातपायावरील बधिरतांची तपासणी करुन सहकार्य करण्याचे आवाहन डीएचओ बी.टी.जमादार,सिव्हील सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले आहे.