लग्नाच्या दहाव्या दिवशीच विवाहितेची आत्महत्या

जळगावातील दांडेकरनगरातील घटना, घातपाताचा आरोप
लग्नाच्या दहाव्या दिवशीच विवाहितेची आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लग्नाच्या दहाव्या दिवशीच करीना सागर निकम वय 19 या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तिच्या सासरी दूध फेडरेशन परिसरातील दांडेकर नगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान करीना हिने आत्महत्या केला नसून तिच्यासोबत तिचे पतीसह सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप तिची आई सुलोचना समाधान भालेराव रा. खिरोदा ता.रावेर यांनी केला आहे.

दरम्यान घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात माहेरच्या तसेच सासरचे नातेवाईक एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले होते

करीना ही यावल तालुक्यातील न्हावी येथे तिची आजी गंगाबाई भालेराव यांच्याकडे शिकायला होता. ती दहावीला गेली होती. आजीच्या सहमतीने करीना हिचा 11 जुलै 2021 रोजी जळगाव शहरातील सागर राजू निकम या तरुणाशी विवाह पार पडला होता.

लग्नानंतर कुलदेवत तसेच मनुदेवी या ठिकाणी करीना व तिचे पती फिरायला गेले होते. तसेच तिच्या आजीकडेही तिला पाठविण्यात आले होते. आज बुधवारी सकाळी करीना हिने तिचे पती तसेच सासर्‍यांना डबा करुन दिला.

सासूबाई बिाहेर होत्या. दीर नागेश हा घरात झोपलेला होता. त्याला चहा हवी असल्याने तो आईला शोधत असतांना घराच्या एका खोलीत पत्र्याचा आवाज आला, आवाजाच्या दिशेने जावून बघितले असता, करीना ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

नागेशसह इतरांनी करीना हिस तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविले. यानंतर जिल्हा रुग्णालयात आणले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले.

मयत करीना हिचे पश्चात पती सागर, दीर नागेश , सासरे राजू वासुदेव निकम व सासू निर्मलाबाई तसेच आजी गंगाबाई, आई सुलोचना भालेराव रा. खिरोदा ता. रावेर असा परिवार आहे. पती दूध फेडरेशनमध्ये कामाला आहेत. तर सासरे राजू सुकदेव निकम यांची मालवाहू गाडी असून ती चालवून उदरनिर्वाह भागवितात. करीनाचे वडीलांचे निधन झालेले आहे.

सासरच्या मंडळींनाही धक्का

करीनाच्या आईन केलेल्या आरोपाबाबत करीनाचे सासरे राजू सुकदेव निकम यांना विचारले असता, ते म्हणाले की, करीना हिची आई किंवा वडील आहेत याबाबत आम्हाला कुठलीच माहिती नव्हती.

आई वडील नसलेली मुलगी आजीकडे राहते. शेतात जावून काम करते, तिच भविष्य उज्ज्वल व्हाव, या उद्देशातून करीना तसेच तिच्या आजीच्या संमतीने आम्ही स्व खर्चाने जळगावात करीनाचे मुलगा सागर याच्यासोबत लग्न केले. ती नाबालिक नव्हे तर 19 वर्षाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

लग्नानंतर नाशिकला गडावर तसेच मनुदेवी करीना व सागर दोन्ही जावून आले. आजीकडेही पाठविले होते. पुन्हा तिला जळगावी आणले.

बुधवारी सकाळी करीनाने माझा तसेच मुलगा सागर याचा डबा करुन दिला. दोन्हीही कामावर गेलो. यानंतर लहान मुलगा दिनेश घरी होता. तर पत्नी निर्मला ही बाहेर गेली होती. दिनेश उठल्यावर आईला शोधायला गेला, त्यावेळी करीना ही घराच्या एका खोलीत दिनेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. दरम्यान करीना हिने आत्महत्या का केली, याबाबत आम्हालाही धक्का बसला असल्याचे राजू निकम यांनी बोलतांना सांगितले.

जिल्हा रुग्णालयात गोंधळ

मयत करीना हिस तिचे दीर तसेच सासरच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत मयत करीना हिचे शिवाजीनगर हुडकोतील मावशी तसेच तिची मुलगी व इतरांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनीही जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी सासरचे व माहेरचे आमने सामने आल्यानंतर गोंधळ उडाला होता.

मयत करीनाची आई सुलोचना आल्यानंतर तिने करीनाच्या सासरच्या आलेल्या महिलांना अरेरावी करत गोंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणात रहावी, यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पूर्वीच तैनात होते. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी करीना हिचे आई तिची समजूत घातली. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

मुलीचा लग्नाला नकार होता, मारझोड करुन केले लग्न

जळगाव शहरातील करीनाचे माहेरचे काही नातेवाईक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून मयत करीना हिचे खिरोदा ता. रावेर येथील आई सुलोचना भालेराव यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार सुलोचना ह्या दुपारी जिल्हा रुग्णालयात आल्या. याठिकाणी ठिकाणी त्यांनी आक्रोश करत तिच्या सासरच्यांनी तिला मारले असा आरोप केला. करीना हीची 2005 सालाची जन्मतारीख असून ती 15 वर्षाची आहे, तिचा लग्नाला नकार होता.

या लग्नाबद्दल थेट लग्नाच्या दिवशीची माहिती मिळाली होती. तिला मारझोड तसेच दमदाटी करुन सासरे राजू निकम तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांनी जबदरस्तीने करीनाचा विवाह केला. करीना मरायला खूप घाबरत होती, त्यामुळे ती आत्महत्या करु शकत नाही, तिला सासरच्यांनीच मारले असल्याचा आरोप यावेळी मयत करीनाची आई सुलोचना हिने जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com