विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

आत्महत्या
आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

खोटेनगरातील रहिवासी आणि नववीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

खोटेनगरातील मानवसेवा शाळेच्या परिसरामधील हर्षल विनोद पाटील (सूर्यवंशी, वय 13) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. हर्षलचे वडील विनोद सूर्यवंशी हे घरात झोपलेले होते. तर हर्षलची आई साधना सूर्यवंशी या काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या होत्या. त्या घरी आल्यानंतर मागील खोलीत गेल्या. त्या ठिकाणी हर्षलने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले.

या घटनेमुळे हर्षलच्या आईने आरडाओरड केली. या आवाजामुळे पुढील खोलीत झोपलेले हर्षलचे वडील धावत आले असता घटना बघून त्यांनीही आक्रोश केला. याबाबत कळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कादीर तडवी, हवालदार साहेबराव पाटील, कॉन्स्टेबल अनिल तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हर्षलला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास कॉन्स्टेबल अनिल तायडे हे करीत आहेत.

हर्षलचे वडील विनोद सूर्यवंशी हे धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील मूळ रहिवासी आहे. ते कुटुंबासह सुमारे चार वर्षांपासून खोटेनगरात राहत आहेत. ते फायनान्समध्ये नोकरीला आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काम बंद आहे. त्यामुळे ते सध्या घरीच मिळेल ते काम करीत आहेत. मृत हर्षलच्या पश्चात आई, वडिलांसह लहान भाऊ विनय आहे. आत्महत्येचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com