गावी परतणार्‍या हजारो कामगारांचे स्थलांतर थांबविले

सहाय्यक कामगार आयुक्तांची माहिती; जळगावसह भुसावळ येथे समुपदेश केंद्र
गावी परतणार्‍या हजारो कामगारांचे स्थलांतर थांबविले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यात अनेक आस्थापना बंदचे आदेश असल्याने हातावर पोट असलेल्या परप्रांतिय कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक कामगार यामुळे गावाकडे परतत आहेत. जिल्ह्यातून गावी परतणार्‍या हजारो परप्रांतिय कामगारांचे कामगार विभागातर्फे विविध केंद्रांवर समुपदेशन करण्यात येवून त्यांना स्थलांतरीत न होण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालय तसेच जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये 50 हजाराच्या आसपास कामगार काम करीत आहेत. यामध्ये 15 हजारापेक्षा अधिक परप्रांतीय कामगार आहेत.

याठिकाणी काम करीत असलेले स्थलांतरीत, परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मुळगावी जात असल्यास तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मुळगावी परत आल्यास असल्यास या कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती शासनाच्या संकेतस्थाळावर पाठविण्यात येणार आहे.

अडचणी असल्यास संपर्क साधा

स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधता येईल. तसेच स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी असल्यास कामगार कार्यालयातील केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्याशी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257- 2239716 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदत कक्षामार्फत अनेक परप्रांतीय कामगारांना थकीत वेतन मिळून देणे अन्न व निवार्‍याची सोय करून देण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना.बिरार यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com