जळगाव : करोना योध्दांचे मानसिक खच्चीकरण थांबवा
जळगाव

जळगाव : करोना योध्दांचे मानसिक खच्चीकरण थांबवा

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात आजपर्यंत ६३९३ व्यक्तींना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ३८८७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्दैवाने यातील ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरूवातीच्या काळात जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक होता. परंतु जिल्ह्याची आरोग्य यंत्रण आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या प्रयत्नामुळे व लोकसहभागातून हा मृत्यूदर कमी करण्यास यश मिळाले आहे. यासाठी शासनाची सर्व यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहे. अशा स्थितीत या योध्यांचे मानसिक संतुलन खच्चीकरण होत असल्याने ते थांबवावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रताप कॉलेज अमळनेर येथे क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल व्यक्ती बापु निंबा वाणी हे प्रशासनास कोणतीही कल्पना न देता दि.११ रोजी अचानक निघून गेले याची माहिती मिळताच पोलिस विभागास याबाबत कल्पना देऊन पोलीस, महसुल व तलाठी यांचे पथकाने त्यादिवशी रात्री दोन वाजेपर्यंत तपास केला. दुसऱ्या दिवशी सुध्दा या पथकाने शोध घेतला.

सर्व तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांचे व्हॉटसॲप ग्रुपवर सदर व्यक्तीचा फोटो टाकून माहिती देण्याबाबत आवाहन केले. परंतु दुर्दैवाने सदर व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. कोवीड केअर सेंटरमध्ये करोनाची लागण झालेल्या परंतु सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांवर उपचार केले जातात. तर करोनाबाधित व्यक्तींचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांचे स्वॅब घेऊन रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाते. त्याठिकाणी त्यांची चहा, पाणी, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली जाते.

बापू वाणी यांच्या मृत्यूस सरकारी यंत्रणेस जबाबदार धरून त्यांना निलंबीत, बडतर्फ करण्याची मागणी ही त्यांना आपल्या कामापासून विचलीत करणारी आहे. तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उप जिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.नि.अ.प्रतापराव पाटील, कैलास सोनार, रवींद्र भारदे, तुकाराम कुळवळे, नितीन उंबरकर, प्रवीण महाजन, रवींद्र मोरे, बी.जे.पाटील, राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भूसंपादन १, प्रसाद मते उपजिल्हाधिकारी रोहयो, दिपक चव्हाण, विकास लाडवंजारी ना.त.महसूल, प्रशांत पाटील यांच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com