जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी संस्था अर्थात ग.स.सोसायटीच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकीसाठी सहकार गट, लोकमान्य गट, प्रगती गट अस्तित्वात होते. वर्षभरापूर्वीच लोकसहकार गटाची निर्मिती झाली आहे.

निवडणूक तोंडावर असल्याने आता पुन्हा महाविकास गटाचा उदय झाला असून हा गट मैदानात उतरणार असल्याने यावर्षी पंचरंगी आणि बहुरंगी लढत रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पॅनलप्रमुखांनी भेटीगाठीतून मोर्चेबांधणीवर भर दिला जात असून उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार गट, लोकमान्य गट, प्रगती गट यांच्यात तिरंगी लढत होऊन सहकार गटाचे 21 संचालक विजयी होऊन सहकार गटाने सत्तेचे सोपान सर केले होते. मात्र, चार वर्षानंतर सहकारला फुटीचे ग्रहण लागून लोकसहकार गटाचा उदय झाला. सरतेशेवटी लोकसहकार गटात उभी फुट पडून पाच संचालकांसह ग.स.सोसायटीच्या 14 संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसहकार गटाचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

त्यानंतर दोनच दिवसानंतर 3 फेब्रवारी रोजी प्रशासकांनी ग.स.सोसायटीचा पदभार घेतल्यानंतर आता ग.स.सोसायटीवर प्रशासकराज सुरु आहे. शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्याअनुषंगाने ग.स.सोसायटीची निवडणूक येत्या एप्रिल ते जून दरम्यान होणार असल्याचा अंदाज आहे.आगामी ग.स.निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी बैठकांवर बैठका घेण्यावर भर दिला आहे. तर काहींनी सभासदांच्या भेटीगाठ घेत नवीन गट बांधणी करुन मैदानात उतरण्याची तयारी सुरु करीत आहे.

महाविकास गटाची आज बैठक

ग.स.संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असून जिल्ह्यात 38 हजार जवळपास सभासद संख्या आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून त्याच त्याच गटाला सत्ता सभासदांनी दिली. मात्र, या कुठल्याच गटाने सभासद हिताचे निर्णय घेतले नाही. त्यात कर्ज मर्यादा वाढविली नाही. व्याजदर कमी केले नाही.

वर्गणीवरील व्याजदर वाढविले नाही. यासर्व बाबींचा विचार करता सभासद नवीन पर्यायाच्या शोधात आहे. म्हणून यावर्षी महाविकास गट सर्वांना सोबत घेऊन सभासदांच्या हितासाठी निवडणुकीत उतरणार आहे. महाविकास गटाची भूमिका सभासदांसाठी असून सर्व समावेशक पॅनलसाठी महाविकास गटाची बैठक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पद्मालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास गटातील सर्व पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास गटातर्फे नाना पाटील यांनी केले आहे.