यावल : जामनेरच्या कापूस व्यापार्‍याकडून मापात पाप

भालोद येथे प्रकार उघड; 40 किलोमागे मोजत होता 14 किलो कापूस जास्त
यावल : जामनेरच्या कापूस व्यापार्‍याकडून मापात पाप

यावल, अरुण पाटील - तालुक्यात सीसीआय केंद्र व कापूस खरेदी केंद्र शासनाने सुरू न केल्याने शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून भावात तर लूट होत आहे मात्र मापातदेखील पाप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. भालोद येथे एक मण (40 किलो) कापसामागे तब्बल 13 ते 14 किलो कापूस जास्तीचा मोजून जामनेरचा व्यापारी शेतकर्‍यांची लूट करत असल्याचे उघड झाले आहे. या व्यापार्‍याची हीच बोंब अनेक ठिकाणी झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर हा व्यापारी खिशात न.पा.तील माजी पदाचे ओळखपत्र सोबत घेवून फिरतो, असेही काही जणांनी सांगितले.

भालोद येथे एका शेतकर्‍याचा कापूस एका दलालामार्फत जामनेरच्या व्यापार्‍याला विक्री केला होता. जामनेरच्या व्यापार्‍याची ट्रक गावी आली व संबंधित भालोद येथील शेतकर्‍याची कापूस मोजणीचा प्रारंभ झाला. घरात पडलेला कापूस शासन खरेदी करीत नसल्यामुळे शेतकर्‍यांना मातीमोल भावाने व्यापार्‍याला द्यावा लागत आहे. त्यातच 40 किलो कापसाच्या मागे 14 किलो कापूस जास्तीचा मोजला जातो. व्यापार्‍याची ही चोरी शेतकर्‍यांनी तोल केलेला कापूस इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजून बघितला. तर तब्बल 14 किलो कापूस जास्तीचा मोजला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. व्यापार्‍याने कापूस भरताना कोरडा कापूस शेतकर्‍यांकडून घेतला व गाडीमध्ये पाणी टाकून ओला चिंब कापूस करून त्याची दबाई करीत होता. कापूस जास्तीचा मोजला जात असल्याचा प्रकार समोर येताच कापूस मोजणे बंद करण्यात येवून शेतकरी संतप्त झाले. यावेळी गावातील काही प्रतिष्ठित यात मध्यस्थी पडल्याने दलालाने आपसात समझोता केला व गाडी तेथून परत गेल्याचे सांगण्यात आले.

यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आता तरी शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्यासाठी अशा दलालांची व व्यापार्‍यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी रास्त अपेक्षा शेतकरी करत आहेत. यावल तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने आता शेतकर्‍यांची लूट थांबण्यासाठी व्यापार्‍याचा काटा तपासणे व पावती फाडली आहे किंवा नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे, असे आता तालुक्यात बोलले जात आहे.

दरम्यान, गेल्या हंगामात विदर्भात कापूस मोजणीत असेच पाप सुरु असल्याचा प्रकार तेथील शेतकर्‍यांच्या लक्षात आला होता. यावेळी याच जामनेरच्या व्यापार्‍याला पकडण्यासाठी शेतकरी सुटले होते, व ट्रक पळविल्याने तीन मजूरांचा मृत्यू झाला होता, अशी आठवणही काही शेतकर्‍यांनी करून दिली. हा व्यापारी अनेक ठिकाणी उघडा पडला, की पैशांची तोडीपाणी करुन घेतो, असेही सूत्रांनी सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com