जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडे राहणार

जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती
जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडे राहणार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने दि. 1 जूनपासून सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत येत्या आठवडाभरासाठी उघडण्यास सशर्त मंजुरी देण्यात येत असून मात्र, पॉझिटिव्हीटीमध्ये वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, डॉ. संतोष नवले, डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. यादव म्हणाले की, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असली, तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यास तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला खबरदारी बाळगावी लागणार आहे.

व्यापारी, ग्राहकांनीही कोरोना विषाणूविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक आस्थापना मालकासह आस्थापनेत कार्यरत कामगारांची दर आठवड्याला कोरोना विषयक चाचण्या करणे अत्यावश्यक आहे.

तसेच दर शुक्रवारी करोना पॉझिटिव्हिटीचा आढावा घेवून पॉझिटिव्हीटी वाढतांना दिसल्यास शिथिल केलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार करण्यात येईल. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणार्‍या आस्थापनांवर कार्यवाहीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. असे त्यांनी सांगितले.

नियमांच्या अंमलबजावणी होते किंवा नाही. यासाठी महापालिका, पोलिस व प्रांत अधिकारी यांनी नेमलेले क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त फिरती पथके गठित करावी. तसेच व्यापक जनजागृतीसाठी मोहीम राबवावी.

व्यापारी महासंघाने आपल्या स्तरावर पथके गठित करून व्यापार्‍यांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे. कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेली गृह विलगीकरणाची सुविधा पूर्णत: बंद करून अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com