फूटपाथ विक्रेते तुपाशी ; दुकानदार उपाशी
जळगाव

फूटपाथ विक्रेते तुपाशी ; दुकानदार उपाशी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील फुले, गोलाणी अशा मोठ्या व्यापारी संकुलांना प्रशासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन व होमडिलीव्हरी व्यवसाय करण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इतर व्यापारी संकुलांप्रमाणे आम्हालाही खुल्या व्यवसायास परवानगी द्यावी, दुकानांच्या वेळात हवे तर दोनतीन तास कमी करा, मात्र आम्हाला दुकानातच व्यवसाय करू द्या अशी मागणी फुले मार्केट व्यापार्‍यांनी केली आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार फुले मार्केट, गोलाणी मार्केट, नवे व जुने बी.जे.मार्केट दुकानदारांना ऑनलाईन, होम डिलीव्हरीने दुपारी 12 ते 4 या वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकाने उघडी आहेत, खरेदीदारही येत आहेत. मात्र दुकानातच कपड्यांची अथवा वस्तू, साहित्याची विक्री न करता हात बांधून उभे रहाण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली आहे. ही अवस्था प्रशासनाच्या आदेशामुळे झाली असल्याची व्यथा राहुल होतचंदानी, बाबु कौरानी, बबलु समदाडीया, राजेश वरयानी आदींसह रमेश नाथानी यांनी व्यक्त केली.

चार महिन्यांपासून दुकाने बंद आहेत आम्हाला रोखीने गिर्‍हाईकी करता येत नाही, आणि आम्ही दुकान उघडून बसल्यावर जर आमच्याकडे एखादा ग्राहक आला तर त्याला आम्ही कुठल्या अंतःकरणाने परत पाठवावे असे एक ना अनेक प्रश्न व्यापारी, दुकानदारांनी उपस्थित केले आहेत. एका वस्तूसाठी होम डिलीव्हरी परवडेल का? खूप सारे दुकानदार आहेत. ग्राहक फोनच्या माध्यमातून कसे चॉईस करणार? शूज, स्कूल बॅग यांची ऑनलाइन विक्री कशी शक्य आहे, असे प्रश्नही व्यापारी उपस्थित करीत आहेत.

फूटपाथ विक्रेत्यांची चांदी

एकीकडे मार्केट बंद असताना फुले मार्केटमधील फूटपाथवर विक्री करणारे विक्रेते यांची मात्र चांगलीच चांदी झाली आहे. फूटपाथ विक्रेते, मुख्य रस्त्यांवरील व फुले मार्केट परिसरातील अतिक्रमणधारक यांचा व्यवसाय मात्र बिनदिक्कतपणे सुरू आहे.

पूर्ण मार्केट हे अतिक्रमण धारक व फूटपाथ विक्रेत्यांनी व्यापले आहे. दुसरीकडे मात्र अधिकृत दुकानदार हे आपले दुकान उघडून केवळ हात बांधून उभे आहेत. त्यांना व्यवहार करण्यास मर्यादा आलेली आहे. रोखीचे खरेदीदार मोठया प्रमाणावर दुकानावरुन नाईलाजाने परतवून लावण्याची वेळ त्यांचेवर आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com