नगर परिषदेची निवडणूक शिवसेना स्वंतत्र लढणार

कॉंग्रेसनेही मांडली वेगळी चुल : महाविकास आघाडीत बिघाडी ?
नगर परिषदेची निवडणूक शिवसेना स्वंतत्र लढणार

वरणगांव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

वरणगाव नगर परिषदेच्या होवु घातलेल्या निवडणूकीसाठी शिवसेनेने नुकतीच बैठक घेवुन सर्वच्या सर्व १८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय कॉंग्रेसनेही बैठक घेवुन वेगळी चुल मांडण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शहरात महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील मोठे विठ्ठल मंदिरात शिवसेना माजी तालुका प्रमुख संजीव कोलते यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व अंगीकृत संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व १८ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कोलते यांनी मागील निवडणुकीत भाजपनंतर शिवसेनेकडे पहिल्या क्रमांकाचे जनमत होते. आता मात्र, स्थानिक पातळीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने हिंदुत्ववादी मते शिवसेनेकडे येतील असे सांगीतले. बैठकीला माजी सरपंच सुशिलकुमार जंगले, माजी ग्रा.पं. सदस्य गोविंद मांडवगणे, जितेंद्र देवघाटोळे, माजी उपतालुका प्रमुख महेंन्द्र शर्मा, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. चंद्रकांत शर्मा, शहरप्रमुख रविंद्र सुतार, उपशहर प्रमुख सूनिल भोई, तुषार चौधरी, प्रशांत पाटील, सुकदेव धनगर, प्रसिध्दी प्रमुख शिवा भोई, दिगंबर चौधरी, विभाग प्रमुख संजय कोळी, रामा शेटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

कॉंग्रेसही मांडणार वेगळी चुल

भाजप, राष्ट्रवादी, पीआरपी शिवसेना पाठोपाठ राष्ट्रीय कॉंग्रेसनेही बैठक घेवुन भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी हा पर्याय आहे. मात्र, राष्ट्रवादी मित्र पक्षाने समान जागा न दिल्यास सर्व जागांवर स्वंतत्र उमेदवार दिले जातील. असा निर्णय झाला. ही बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य राजाभाऊ देशमुख तर के .बी. काझी, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अशफाक काझी, मुस्लीम अन्सारी, डॉ .अनुजा भोईटे, कल्पना तायडे, मनोज देशमुख, राजेश काकाणी, ज्ञानेश्वर पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे शिवसेनेप्रमाणे कॉंग्रेसही आपली वेगळी चुल मांडण्याच्या तयारीला लागली आहे. या प्रकाराने महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com